धाराशिव (प्रतिनिधी)- काळ कधी काय वाढून ठेवेल याचा नेम नसतो. राज्याच्या राजकारणातील एक झंझावात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बारामतीसह धाराशिववरही दुःखाचे सावट पसरले असतानाच, राज्याच्या राजकारणातून एक ऐतिहासिक निर्णय समोर आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी आणि धाराशिवच्या सुकन्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एका बाजूला पतीच्या जाण्याचे अतीव दुःख आणि दुसरीकडे राज्याची जबाबदारी, अशा कठीण प्रसंगात ही धाराशिवची लेक खंबीरपणे उभी ठाकली आहे.
सुनेत्रा पवार यांचा जन्म धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक तेर गावचा. बाजीराव पाटील यांच्या या कन्येला माहेरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. 30 डिसेंबर 1985 रोजी त्यांचा विवाह शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्याशी झाला. हा विवाह म्हणजे राजकारणातील दोन मोठ्या घराण्यांचे मिलन होते. तत्कालीन मातब्बर नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांनी स्वतः हा प्रस्ताव शरद पवार यांच्याकडे ठेवला होता. तेव्हापासून सुनेत्रा बाजीराव पाटील बारामतीची सून म्हणून घराची आणि मतदारसंघाचीही धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत.
सुनेत्रा पवार या बाजीराव पाटील यांच्या तिसऱ्या पत्नीच्या कन्या. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आपल्या या धाकट्या बहिणीची नेहमीच पित्यासमान काळजी घेतली. आजही माहेरचा हा मोठा आधार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. डॉ. पद्मसिंह पाटील वार्धक्यामुळे थकलेले असले, तरी त्यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आपल्या आत्याला सावरण्यासाठी सावलीसारखे सोबत आहेत. लाडक्या जावयाच्या अकाली जाण्याने पाटील कुटुंबासह संपूर्ण धाराशिवकरांच्या डोळ्यात पाणी आहे. मात्र आपल्या लेकीच्या खांद्यावर राज्याची मोठी जबाबदारी आल्याने मनावर दगड ठेवून ते तिला आधार देत आहेत.
दुःखाच्या प्रसंगात आशेचा किरण
बी.कॉम. पर्यंत शिक्षण झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे प्रशासकीय समज आणि शांत संयमी स्वभाव ही मोठी जमेची बाजू आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना अशा वेळी मिळाला आहे, जेव्हा त्यांच्यावर वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठे संकट कोसळले आहे. अजितदादांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे, पण सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राज्याला एक संवेदनशील नेतृत्व मिळाले आहे. दुःखातही हा धाराशिवसाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना सध्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून व्यक्त होत आहेत.
आज अवघा महाराष्ट्र सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभा आहे. नियतीने दिलेला घाव सोसत, एका कर्तबगार पत्नीने राजधर्माचे पालन करण्यासाठी उचललेले हे पाऊल भविष्यात राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास धाराशिवकरांच्या मनात आहे.
