राजा वैद्य

धाराशिव- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे एकीकडे दुःख आहे, कार्यकर्ते यांच्या निवडणुका आहेत. उमेदवार, कार्यकर्ते याचा आग्रह, लाडक्या बहीण भावांना भेटायचं म्हणुन मी आलो असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उद्याच्या भविष्याचा फैसला व गावाच्या विकासाच्या या निवडणूका आहेत, लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगर परिषद याला यश दिले त्यांची पुनरावृत्ती होणार असे चित्र मला दिसत आहे. ही निवडणुक कार्यकर्ते यांची आहे, हेच आम्हाला निवडुन देतात व आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतात. मी काल, आज व उद्याही कार्यकर्ता म्हणुन काम करणार. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो. पायाला भिंगरी लावुन फिरलो व सामान्य लोकांची कामे केली, बंद पडलेल्या योजना, प्रकल्प सुरु केले असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या मुलीने वडिलांना फीस भरता येत नसल्याने ते आत्महत्या करतील या विचारातून स्वतः आत्महत्या केली, मनाला वेदना झाली मी 100 टक्के फीस माफ केली. शेतकरी सन्मान योजना सुरु केली. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकरी यांचा आहे. मी देखील आईची तगमग व पत्नीची धावपळ पाहिली आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरु केली. अनेक अडथळे आले मात्र ती सुरु ठेवली, 45 हजार कोटी यासाठी लागतात, कोण हिम्मत करीत नव्हते मात्र मी केली. महिला एकत्र आल्या व्यवसाय सुरु केल्याच्या यशोगाथा आहेत. 3 महिन्याचे 4 हजार 500 एकदम जमा होणार आहेत. कोणीही मायका लाल आला तरी योजना बंद होणार नाही. 

कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमची बैठक झाली. समिती गठीत केली असुन अहवाल आला की निर्णय घेऊन, जे बोललो ते करणार, तो निर्णय सुद्धा घेणार व शेतकऱ्यांना दिलासा देणार असे शिंदे म्हणाले. त्याला हिम्मत लागले, आम्ही देणारे हात आहोत. विरोधक काय बोलणार त्यांचे हात रिकामे आहेत. त्यावेळी सत्ता असताना काही दिले नाही आता तर काही नाही, मग काय देणार, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लागवला. आम्ही देणारे हात आहोत, देण्याची दानत लागते. रोजगार वाढले पाहिजेत त्यासाठी काम करणार असल्याचे शिंदे म्हणाले.

लोकांना काय हवे आहे ते द्या असे आमचे धोरण आहे. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सामान्य लोकांच्या जीवनात सोनेरी दिवस आणणारे आहोत, सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री झाला हे पाहवत नाही, त्यांचा इतका पोटसुळ का? असा सवाल करीत त्यांनी टीका केली. तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकासासाठी 1 हजार 800 कोटी दिले. लढाई खुर्चीची नाही लोकांसाठी आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेचे काम करणार, पैसे पेक्षा किती माणसे कमावली हे धोरण आहे.

उस्मानाबादचं धाराशिव करण्याचा निर्णय मुख्यमंत्री असताना घेतला याचा अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे या जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. विरोधक येतील व आश्वासन देतील व खोटं बोलतील, दर महिन्याला लाडक्या बहिणींना ओवाळणी न चुकता बँकेत जमा होईल असे ते म्हणाले. पाणी, शेतीचा, चांगले रस्ते, वीज प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन त्यांनी दिले. उमरगा येथे नवीन पंचायत समिती इमारत, शास्वत पाणी आणू. लोहारा येथे एमआयडीसी करणार, मराठवाडा हा दुष्काळवाडा आहे हा शब्द पुसून काढायचा आहे, मराठवाडा वॉटर ग्रीड सुरु करायचे असुन दुष्काळमुक्ती हा आमचा संकल्प आहे असे ते म्हणाले. 

यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार, नगराध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हा प्रमुख मोहन पनूरे, सुरज साळुंके, नितीन लांडगे, ऍड योगेश केदार, आनंद पाटील उपस्थितीत होते. 

उमरगा लोहारा येथे भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशी महायुती झाली असल्याचे रवींद्र गायकवाड म्हणाले. असे असतानाही भाजपने माकणी येथे भाजपने उमेदवार दिला आहे. त्यांनी गद्दारी केली आहे त्यांना धडा शिकवा असे आवाहन गायकवाड यांनी केले. तिथे नातेवाईक, कार्यकर्ते यांची जास्तीत जास्त मते गोळा करा व भाजपला पराभूत करा असे आवाहन त्यांनी केले. 

पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक म्हणाले की, ठाणे मुंबई पासुन इतक्या लांब मला इथला विकासासाठी करण्यासाठी नेमले. करोडो रुपयांची विकास कामे होत असुन येत्या 5 वर्षात अनेक कामे होतील. लाडक्या बहिणींना आर्थिक आधार देण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला. धाराशिव जिल्ह्यात महायुतीचा विजय होऊन भगवा फडकेल असे ते म्हणाले. माकणीची जागा ही फक्त आणि फक्त शिवसेनेची आहे, तिथे सगळीकडे शिवसेना दिसली पाहिजेत, दुसऱ्या कुठल्याही बटणाला हात लावला तर शॉक लागेल असे सांगायला सुरुवात करा व मोठ्या मतांनी विजयी करा असे आवाहन पालकमंत्री सरनाईक यांनी केले.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top