तुळजापूर (प्रतिनिधी)- महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्री मुद्ग्‌‍लेश्वर महादेव सेवा समिती तुळजापूर यांच्या वतीने श्री मुद्ग्‌‍लेश्वर मंदिर येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल 11 हजार किलो शाबू, 21 हजार राजगिरा लाडू तसेच विविध फळांचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. सकाळी 7 वाजल्यापासून महाप्रसाद वितरणास सुरुवात झाली असून, दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुळजापूर व परिसरातील हजारो भाविकांनी श्री मुद्ग्‌‍लेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन उपवास, व्रत-वैकल्य करून श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला. “हर हर महादेव”च्या जयघोषात मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने भारून गेला होता. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भाविकांनी अभिषेक, पूजा-अर्चा करून भगवान शंकराच्या चरणी मनोभावे नतमस्तक होत सुख-समृद्धीची प्रार्थना केली. सेवा समितीच्या वतीने नियोजनबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महिला, वृद्ध, लहान मुले तसेच दूरवरून आलेल्या भाविकांसाठी स्वतंत्र रांगा व मदत कक्ष उभारण्यात आले होते. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध व सेवाभावी वृत्तीने काम पाहिल्याने कोणताही गोंधळ न होता महाप्रसाद वितरण सुरळीत पार पडले.

श्री मुद्ग्‌‍लेश्वर महादेव सेवा समिती तसेच मुद्ग्‌‍लेश्वर युवा प्रतिष्ठान तुळजापूर यांच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहिमा, गरजूंसाठी मदतकार्य, धार्मिक उत्सवांचे आयोजन अशा उपक्रमांमुळे संस्थेची सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने झालेल्या या भव्य महाप्रसाद उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत असून, “सेवा हीच शिवसेवा” या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम तुळजापूरच्या धार्मिक व सामाजिक जीवनात एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.


 
Top