उमरगा (प्रतिनिधी)-  उमरगा शहर व परिसरात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याच्या पार्श्वभूमीवर दि. 24 (मंगळवार) रोजी ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने पोलीस स्टेशन उमरगा येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शहर व तालुक्यात वाढत चाललेल्या छेडछाड, पाठलाग, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवून नेणे अशा प्रकारांविरोधात तातडीने कठोर उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

फाउंडेशनच्या प्रतिनिधींसह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून उमरगा शहरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसच्या परिसरात टपोरी मुलांचे घोळके वाढले असून, मुलींची छेडछाड, टिंगल-टवाळी, घुरून पाहणे व पाठलाग करणे या प्रकारांत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक स्वास्थ्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.

विशेष म्हणजे त्रिकोळी येथील एका अल्पवयीन मुलगी गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता असल्याची गंभीर बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना निर्माण झाली असून, या प्रकरणाचा जलद व सखोल तपास करून संबंधित मुलगी सुरक्षित परत मिळवावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर सत्यनारायण जाधव, ऍड. अर्चना जाधव, राजू भालेराव, करीम शेख, किशोर औरादे, ऍड. ख्वाजा शेख, धानय्या स्वामी, ज्योती माने, शबाना उडचणे-शेख, किशोर बसगुंडे, राजू बटगिरे, प्रदीप मोरे, प्रदीप चौधरी, संतोष चव्हाण, बबीता मदने यांसह विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन उमरगा परिसरात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 
Top