धाराशिव (प्रतिनिधी)- आपल्या पाल्यांच्या बौद्धिक व मानसिक वाढीत काही कमतरता, बदल किंवा वेगळेपणा जाणवत असल्यास पालकांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. मूल एकटंच खेळत असेल, मित्रांमध्ये मिसळत नसेल, हाक मारली तरी प्रतिसाद देत नसेल, डोळ्यात डोळे मिळवत नसेल, लक्ष केंद्रित करत नसेल किंवा नीट बोलत नसेल, तर अशी लक्षणे स्वमग्नता अर्थातची असू शकतात. हा मुलांच्या मेंदूच्या विकासाशी संबंधित न्युरो-डेव्हलपमेंटल विकार असून साधारणपणे वयाच्या दोन ते तीन वर्षांपर्यंत त्याची लक्षणे दिसू लागतात. हा विकार संसर्गजन्य नाही तसेच पालकांच्या चुकीमुळे होत नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
स्वमग्नतेमुळे मुलांच्या संवाद कौशल्यावर, सामाजिक वर्तनावर आणि एकूणच वागणुकीवर परिणाम होतो. अशा मुलांमध्ये हाक मारली तरी प्रतिसाद कमी देणे, इतर मुलांबरोबर खेळण्यात रस नसणे, भावना समजण्यात अडचण येणे, बोलायला उशीर होणे, शब्दांची किंवा वाक्यांची पुनरावृत्ती करणे, एकच हालचाल वारंवार करणे, चिडचिड किंवा रागाचे झटके येणे तसेच शालेय शिक्षणावर परिणाम होणे अशी लक्षणे आढळतात. प्रत्येक मुलामध्ये या विकाराची तीव्रता वेगवेगळी असू शकते.
या विकारासाठी कोणतीही विशिष्ट तपासणी उपलब्ध नसून तज्ञांच्या निरीक्षणातून निदान केले जाते. त्यामुळे लक्षणे दिसताच त्वरित तज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. भारतामध्ये साधारणपणे 250 मुलांमागे एका मुलामध्ये हा विकार आढळतो. काही प्रमाणात अनुवंशिकता तसेच मोबाईल किंवा स्क्रीन टाइमचा अतिरेक कारणीभूत असू शकतो, मात्र याचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उपचारामध्ये बिहेविअरल थेरपी, स्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी यांचा समावेश होतो आणि त्यात सातत्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच पालकांचे समुपदेशनही मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे ठरते.
बालरोगतज्ञ संघटना, जिल्हा परिषद दिव्यांग विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय, रोटरी क्लब धाराशिव Rotary Club Dharashiv, Forum for Autism Mumbai ,डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर, संयुक्त विद्यमाने तसेच Tata Power Community Development Trust यांच्या सहकार्याने पालकांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दि. 27 फेब्रुवारी 2027 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत नर्सेस ट्रेनिंग हॉल, सिव्हील हॉस्पिटल, धाराशिव येथे होणार आहे. या कार्यशाळेत तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने तसेच पालकांना किट वाटप करण्यात येणार असून प्रवेश विनामूल्य आहे. गरजवंत पालकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.