धाराशिव (प्रतिनिधी)- तालुका आरोग्य व्यवस्थेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा अत्यंत मानाचा “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न” राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार तालुका आरोग्य कार्यालय, धाराशिव यांना प्रदान करण्यात आला. तालुका सुपरवायझर तानाजी क्षीरसागर यांना दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे आयोजित भव्य व गौरवशाली सोहळ्यात मुख्यमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या हस्ते एक लाख रुपये रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तानाजी क्षीरसागर हे तालुका आरोग्य कार्यालयात तालुका सुपरवायझर म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, धाराशिव तालुक्यात आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, सर्वसमावेशक व लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
विशेष म्हणजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी यांनी आरोग्य विषयक कामे प्रभावीपणे कशी राबवावीत, कामाचे सूक्ष्म नियोजन कसे करावे, तसेच विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी कशी करून घ्यावी याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनाचा आदर्श अंगीकार करून तानाजी क्षीरसागर यांनी धाराशिव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित करत शासनाने दिलेली उद्दिष्टे शंभर टक्के पूर्ण करून घेतली. या उल्लेखनीय यशानिमित्त तालुका आरोग्य कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी यांच्या हस्ते तानाजी क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.
