धाराशिव (प्रतिनिधी)- ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या 27 फेब्रुवारी या जयंतीदिनानिमित्त “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून,मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.त्यांच्या कार्याचा सन्मान आणि स्मरण म्हणून त्यांचा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्याचे मुख्य धोरण मराठी भाषा विभागाने निश्चित केले आहे.
या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना “घेवू या एकच वसा, मराठीला बनवू या ज्ञानभाषा” अशी असून,विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरव करण्यात येणार आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जिल्ह्यातील मराठी भाषा साहित्यिकांच्या सहभागातून ‘मातृभाषेचे व्यक्तीगत व समाजजीवनातील स्थान’ या विषयावर मराठी भाषा साहित्य परिसंवाद व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.