उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 3, काँग्रेस 2, शिवसेना (शिंदे) 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1 तर 2 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने जनतेचा कौल संमिश्र दिसून येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरे सेनेचा सुपडा साफ झाला आहे. पंचायत समितीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सभापती पदावरुन वेगळी समीकरणे जुळून येण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, माजी सभापती ॲड. अभयराजे चालुक्य यांनी तर शिवसेना (शिंदे) कडून माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उमरगा नगराध्यक्ष किरण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) कडून प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे सचिव महेश देशमुख, जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे व शिवसेना (ठाकरे) कडून खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रविण स्वामी यांनी प्रचारात जीवाचे रान केले. सोमवारी (दि.9) झालेल्या मतमोजणीत नगरपालिकेच्या निकालाची पुनरावृत्ती होत ठाकरे गटाचे पानीपत झाल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद मतदारसंघातील विजयी उमेदवार दाळिंब - रफिक तांबोळी (भाजपा), येणेगुर - रचना राठोड (भाजपा), गुंजोटी - शहाजी पाटील (भाजपा), कवठा महेश देशमुख (काँग्रेस), कुन्हाळी लताताई मोरे (काँग्रेस), कदेर - उषाताई गायकवाड (शिवसेना), बलसुर - सविता बिराजदार (राष्ट्रवादी काँग्रेस), तुरोरी - अर्चना जाधव (अपक्ष), आलुर - आप्पासाहेब पाटील (अपक्ष) हे उमेदवार निवडून आले आहेत.
तर पंचायत समितीच्या 18 जागापैकी भाजपाला 7 यामध्ये डिग्गी - अनिल माने, दाळिंब - अमर वाले, भुसणी - कैलास शिंदे, येणेगुर - विजयालक्ष्मी पाटील, तुगाव - रेखा मुळे, आलुर - राजकुमार माने, तलमोड - दगडू मोरे तर शिवसेना शिंदे 5 यामध्ये केसरजवळगा - आकांक्षा चौगुले, कदेर - महानंदा कलबुर्गे, माडज - मन्मथ स्वामी, गुंजोटी - स्नेहा जाधव, तुरोरी - तुकाराम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस बलसुर - अर्चना पाटील, काँग्रेस 3 यामध्ये कुन्हाळी - रविंद्र हंगरगे, कवठा - रुक्मिणी कांबळे व नाईचाकुर - सुगलाबाई मदने, शिवसेनेच्या चिन्हावर मनसेचे तालुकाध्यक्ष हरी जाधव जकेकुर गणातून तर मुळज गणातून रेखा इंगळे या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत. निकालानंतर सर्वच विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
पंचायत समितीचे सभापती पद अनुसुचित जाती साठी राखीव असुन भाजपाचे कैलास शिंदे व शिवसेना (शिंदे) च्या आकांक्षा ज्ञानराज चौगुले दोघेही या पदाचे प्रबळ दावेदार आहेत. महायुतीला 18 पैकी 13 जागेवर घवघवीत यश मिळाले. तरी सभापती पदावरुन रस्सीखेच होईल आणि वेगळी राजकीय समीकरणे जुळतील असा अंदाज आहे.