धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक मतमोजणी सोमवारी दि.9 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या ठिकाणी पार पडली. या निवडणुकीत महायुतीमधील भाजप शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 55 पैकी 40 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. असे असले तरी महायुतीमधील शिवसेना पक्षाचे आमदार तानाजी सावंत यांना त्यांच्या मतदार संघात मित्र पक्ष असलेल्या भाजपाने नगरपालिका निवडणूक असो की जिल्हा परिषद, पंचायत समिती एकाकी पाडले आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेत ते भाजपाला धडा शिकविण्यासाठी वेगळी चाल खेळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेषत: त्यांचे भूम, परंडा, वाशी तालुक्यातील शिवसेनेच्या सदस्यांची भूमिका वेगळी असण्याची शक्यता आहे. त्यास पुष्टी म्हणून की काय, कमी सदस्यसंख्या असलेल्या ठाकरे सेनेनेही आपले सदस्य सुरक्षीत ठिकाणी हलवले आहे. त्यामुळे कुछ तो गडबड हे, अशी चर्चा जिल्ह्यात सुरु असून, जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही काही दगा, फटका होवून नये, या भितीने भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही आपले सदस्य सुरक्षीत ठिकाणी हलविले आहेत. तसेच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे सदस्यही त्यांनी सोबत घेतल्याची माहिती कळत आहे. याशिवाय सत्तासमीकरण जुळविण्यासाठी अपक्षही गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जिल्हा परिषद निवडणूकीत भारतीय जनता पक्षास 19 जागा, शिवसेना पक्षास 15 जागा, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 06, शिवसेना ठाकरे पक्ष 07, राष्ट्रीय काँग्रेस 03, समाजवादी पक्ष 01 तर अपक्ष 4 अशी एकूण 55 सदस्यसंख्या आहेत. अध्यक्ष होण्यासाठी किमान 28 सदस्यांचे बहुमत होण्याची आवश्यकता आहे.

तेवढा आकडा कोणत्याच एकट्या पक्षाकडे नाही. त्यामुळे महायुतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडे 15 सदस्य संख्येच्या जोरावर ते विरोधातील सदस्यांना सोबत घेवून आपला अध्यक्ष जिल्हा परिषदेत बसवू शकतात. विशेष म्हणजे आमदार तानाजी सावंत यांनी भाजपा आमदार पाटील यांना पालिका निवडणूकीतील धडा शिकवण्यासाठी ही खेळी करु शकतील अशी चर्चा जिल्ह्यात जोरात सुरु आहे. त्याचे कारण म्हणजे आमदार सावंत यांनी या निवडणूकीत प्रचारादरम्यान अनेकवेळा ही बाब बोलूनही दाखवलेली आहे.

त्यामुळे शिवसेनेचे 15 सदस्य अधिक त्यांनी ठाकरे सेना, कॉग्रेस व अपक्षांना सोबत घेतले तरी ते अध्यक्षपदासाठीचा बहुमताचा आकडा गाठू शकतील. तशी रणनिती आखली जात असल्याचेही जोरदार चर्चा सुरु आहेत. आमदार सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे एबी फॉर्म वाटपावरुन भाजपा आमदार पाटील यांच्यावर त्यांनी नाव न घेता अनेकवेळा टिकाही केली आहे. त्यामुळे भाजपाला जिल्हा परिषदेत सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी त्यांची ही रणनिती असू शकते, अशी चर्चाही आता जोरात सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षाकडून आपआपले उमेदवार सुरक्षीत ठिकाणी हलविण्याची प्रक्रीया सुरु केली आहे हेच यावरुन स्पष्ट होत आहे. 


 
Top