धाराशिव (प्रतिनिधी)- धनादेश न वटल्याच्या (कलम 138) प्रकरणात धाराशिव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी खलील सैफ सय्यद यांचे अपील फेटाळून लावत कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे आरोपीस सुनावलेली शिक्षा अबाधित राहिली आहे.
तक्रारदार हरिदास केशवराव पवार यांनी आरोपी खलील सैफ सय्यद याच्याविरुद्ध धनादेश न वटल्याप्रकरणी (एस.सी.सी. क्र. 440/2015) खटला दाखल केला होता. या प्रकरणी दि. 21 मार्च 2023 रोजी 5 वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, धाराशिव यांनी आरोपीस 2 महिने साधी कैद व तक्रारदारास 2 लाख 80 हजार रुपये 9 टक्के व्याजदराने नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता. तसेच नुकसानभरपाईची रक्कम न दिल्यास आणखी 1 महिना साधी कैद भोगण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती.
या निकालाविरोधात आरोपीने फौजदारी अपील क्र. 08/2023 द्वारे सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांच्या न्यायासनासमोर या अपीलाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान तक्रारदाराच्या वतीने ॲड. बी. के. मोरे यांनी प्रभावी युक्तिवाद करत पुराव्यांच्या आधारे कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायदेशीर व योग्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने पुरावे व कायद्याच्या तरतुदींचा योग्य विचार करूनच निर्णय दिल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे निकालात हस्तक्षेप करण्याचे कारण नसल्याचे नमूद करत आरोपीचे अपील फेटाळून लावण्यात आले. या निकालामुळे आरोपीस सुनावलेली शिक्षा कायम राहिली असून तक्रारदाराच्या बाजूने निकाल लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात ॲड. मोरे यांना ॲड. मयूर तोडकरी यांनी सहकार्य केले.