धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, धाराशिव यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्राचा शाहिरी बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमात फोक आख्यान, शाहिरी परंपरा आणि पारंपरिक लोककलेचा प्रभावी संगम अनुभवायला मिळाला. भाजपा नेते मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सौजन्याने संपन्न झालेल्या या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
युवाशाहीर चंद्रकांत माने आणि युवाशाहीरा ऋतुजा माने यांनी आपल्या दमदार आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा आणि स्वराज्याची प्रेरणा सादर केली. धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास उलगडणाऱ्या पोवाड्यांनी उपस्थितांना भारावून टाकले. शिवबा माझा राजा आणि धन्य धन्य जिजाऊ माता हे पोवाडे विशेष दाद मिळवून गेले.
शिवबाला जसे घडविले तशी जिजाऊ असावी या गीतातून राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, हिरकणी, झाशीची राणी आणि पद्मावती यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. माता जिजाऊची पुण्याई या सादरीकरणातून मातृत्व आणि संस्कारांची महती अधोरेखित झाली. अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या प्रेरणादायी गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. जेजुरीचा राजा गेला बाणूच्या वाडयाला मल्हारी मार्तंड हे गीत तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी यांच्यावरील अग अंबाबाई लाड लाड ये गं आणि गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी या गोंधळ गीतांनी धार्मिक रंगत वाढवली. स्वराज्याच तोरण बांधल या गीतावर तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद देत जल्लोष केला.
यावर्षी महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले. आकर्षक प्रकाशयोजना, दर्जेदार ध्वनीव्यवस्था आणि देखणी रंगमंच सजावट यामुळे कार्यक्रमाची शोभा खुलली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी समितीच्या वतीने कोकाटे परिवारांकडून नगराध्यक्षा नेहा काकडे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. दत्ता बंडगर, रोहित पडवळ, संदीप इंगळे, बलराज रणदिवे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.