धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या रणधुमाळीत सास्तूर (ता. लोहारा) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार श्री. प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मतदारांशी थेट संवाद साधून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

या सभेद्वारे उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला: सास्तूर जिल्हा परिषद गट: सावळकर सागरबाई अशोक, सास्तूर पंचायत समिती गण: स्वाती समाधान मोरे तावशीगड पंचायत समिती गण: रुचिता रोहण गायकवाड सभेला मार्गदर्शन करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ठाम भूमिका मांडली. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांच्या समस्या, महिला सक्षमीकरण आणि तरुणांच्या हाताला काम या मूलभूत प्रश्नांवर पक्ष कशा प्रकारे काम करणार आहे, याची सविस्तर दिशा त्यांनी स्पष्ट केली. “हा पक्ष जनतेच्या विश्वासावर उभा असून, विकास आणि न्यायासाठी आमचा लढा निरंतर सुरू राहील,“ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.आमदार प्रवीण स्वामी यांनी स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर भर देत, पारदर्शक कारभारासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

 
Top