धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर, लोहारा तालुक्यातील जेवळी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा आणि मतदारांशी थेट संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार श्री. प्रवीण स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विजयाचा निर्धार व्यक्त केला.
जेवळी जिल्हा पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार अरुणकुमार बसवराज हावळे यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेत नेत्यांनी ग्रामीण विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडला.
ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कटिबद्ध असून विकास, न्याय आणि लोकहितासाठी पक्ष सदैव तत्पर राहील, असे आश्वासन नेत्यांनी दिले. शेतकरी, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या रोजगाराच्या मूलभूत प्रश्नांवर पक्षाची ठाम भूमिका मांडण्यात आली.
उमेदवार अरुणकुमार हावळे यांनी जनतेशी संवाद साधताना “प्रामाणिक सेवा, पारदर्शक कारभार आणि लोकहितासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन,“ अशी ग्वाही दिली. या सभेला शिवसैनिकांसह परिसरातील नागरिकांची, तरुणांची आणि महिलांची मोठी उपस्थिती होती. “जनतेच्या विश्वासावर शिवसेना ठाम असून हा विश्वासच आगामी निवडणुकीत विजयाचा मार्ग प्रशस्त करेल,“ असा विश्वास यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला. या मेळाव्यामुळे जेवळी आणि परिसरात शिवसेनेच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
