तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे दिंडेगाव येथील ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सद्गुरू शिवरामबुवा यांच्या यात्रा महोत्सवाचा शुभारंभ येत्या महाशिवरात्री, रविवार दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य व दिव्य वातावरणात होत आहे. यंदा हा उत्सव परंपरेतील 321 वा वर्ष म्हणून विशेष ठरणार आहे.
परंपरेचा अखंड वारसा, अवघ्या पाचव्या वर्षी सद्गुरू महादजीबुवा यांच्या हस्ते अनुग्रह प्राप्त झाल्याच्या पवित्र स्मृतीदिनानिमित्त हा उत्सव साजरा केला जातो. सुमारे तीन शतकांहून अधिक काळ अखंड परंपरेने सुरू असलेला हा सोहळा गेल्या आठ पिढ्यांपासून दिंडेगावकर घराण्याकडून चालविला जात आहे.
यावर्षी गादीचे विद्यमान सातवे उत्तराधिकारी आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव उत्साहात पार पडणार आहे.महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व असे की ,महाशिवरात्री हा दिवस सद्गुरू शिवरामबुवांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जातो. याच दिवशी त्यांना गुरुकृपेचा लाभ झाला. परंपरेनुसार या उत्सवकाळात सद्गुरू महादजीबुवा व पंढरीनाथ परमात्म्याचे दैवी सान्निध्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सद्गुरू शिवरामबुवांनी सुरू केलेला रात्रभराचा दिंडी जागरण सोहळा आजतागायत अखंडपणे सुरू असून यंदाही तो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
तीन दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन पुढीलप्रमाणे,
शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी एकादशी निमित्त पालखी आगमन , रविवार, दि. 15 फेब्रुवारी (महाशिवरात्री) दिवसभर देवदर्शन व रात्री दिंडी जागरण , सोमवार, दि. 16 फेब्रुवारी अन्नदान पंगत, दिवसभर देवदर्शन व रात्री वडाच्या झाडाखाली गुरुवर्यांचे कीर्तन, मंगळवार, दि. 17 फेब्रुवारी दुपारी 2.30 वा. गुरुवर्यांच्या पवित्र हस्ते काला महाप्रसाद वाटप व सायं. 5 वा. आरतीने उत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांना मंदिर संस्थान कडून आवाहन करण्यात येते की, ग्रामदैवताच्या या पवित्र उत्सवात गाव परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी होऊन सद्गुरूंच्या कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे प्रमुख गुरुवर्य आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांनी केले आहे. दिंडेगाव नगरीत महाशिवरात्री निमित्त भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी भाविकांना लाभणार आहे.
