भूम (प्रतिनिधी)- इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा जवळ येत असताना विद्यार्थ्यांमध्ये ताण आणि घाईचे वातावरण निर्माण होते. मात्र योग्य नियोजन केले तर उरलेला वेळही यशस्वी तयारीसाठी पुरेसा ठरू शकतो. नियोजनबद्ध अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेतील कामगिरीही सुधारते.

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी वास्तववादी वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. दिवसातील एकाग्रता जास्त असलेल्या वेळेत गणित, विज्ञान यांसारखे कठीण विषय ठेवावेत, तर सोपे विषय कमी वेळेत पूर्ण करावेत. संपूर्ण अभ्यासक्रम एकदम न करता तो छोटे-छोटे भागांमध्ये विभागल्यास अभ्यास अधिक सोपा आणि नियोजनबद्ध होतो.

उरलेल्या दिवसांत नवीन धडे सुरू करण्यापेक्षा पुनरावृत्तीला अधिक महत्त्व द्यावे. स्वतःचे छोटे नोट्स, सूत्रांची यादी किंवा महत्त्वाचे मुद्दे तयार ठेवले तर शेवटच्या क्षणी अभ्यास सुलभ होतो. तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका वेळेच्या मर्यादेत सोडवण्याचा सराव केल्यास उत्तरलेखनाची गती वाढते आणि परीक्षेची भीती कमी होते.

अभ्यासाबरोबरच आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दर 40 ते 50 मिनिटांनी छोटा ब्रेक घेणे, पुरेशी झोप घेणे आणि मोबाईलचा वापर मर्यादित ठेवणे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते. स्वतःची इतरांशी तुलना न करता रोजच्या छोट्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केल्यास सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.


योग्य नियोजन, नियमित पुनरावृत्ती आणि आत्मविश्वास या तीन गोष्टी लक्षात ठेवल्यास दहावीची बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांसाठी तणावाचा विषय न राहता यशाचा टप्पा ठरू शकते.

श्रीमती चेडे पुनम गौतम सहशिक्षिका 

 जे. आय. आर. टी. तंत्र प्रशाला वाशी. ता. वाशी, जिल्हा धाराशिव. 

 
Top