धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण सत्संग मंडळ, सकल संत सेवा समितीचे प्रमुख मार्गदर्शक ,विश्व ट्रॅव्हल्स चे पार्टनर श्री शामराव दहिटणकर यांचे आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी विजया एकादशीच्या पवित्र दिनी निधन झाले .(75) हे दुःखद बातमी समजताच समितीतील सर्व सदस्य, त्यांचे हितचिंतक ,व पारमार्थिक क्षेत्रातील सहभागींना मोठा धक्का बसलेला असून, त्यांच्या प्रती शोक व्यक्त करून जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे.
उत्कृष्ट शिक्षक म्हणून सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी आपले पुढील जीवन पारमार्थिक क्षेत्राला वाहून घेतलेले होते. तेव्हापासून आजतागायत त्यांच्या वास्तु खालील रामकृष्ण सत्संग हाल या वास्तूत विविध अध्यात्मिक कार्यक्रमाचा सात्विक पसारा वाढवलेला होता. ज्यात हस्तलिखित ग्रंथाचे लेखन ,भजन ,कीर्तन, प्रवचन, संत महात्म्यांच्या पुण्यतिथी, ग्रुप तीर्थयात्रा ,व केवळ पाच महिलांना सोबत घेऊन तयार केलेला गीता परिवार आज दोनशे पेक्षा जास्त संख्येचा झालेला असून, प्रत्येक एकादशीला एकत्र जमून गीता सत्संग चालू आहे.
धाराशिव येथील स्वयंवर मंगल कार्यालयात गेली दोन वर्षांपासून संत गोरोबा काका व संत तुकाराम महाराज यांच्या चरित्र कथेचे भव्य आयोजन केलेले होते. व यावर्षी वीस मार्च रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरित्र कथेचे आयोजन केलेले होते.त्या संदर्भात दोन बैठकाही झालेल्या होत्या. व तिसरी बैठक 14 फेब्रुवारी 2026 रोजी होणार होती.... पण नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते त्यांचे अध्यात्मिक कार्य आता पूर्ण झाल्याने विजया एकादशीच्या शुभ दिवशी त्यांना पांडुरंगाने आपल्या जवळ घेतले. हेच त्यांच्या जीवनकार्याचे फळ समजावे लागेल.
जीवनभर केलेला अध्यात्माचा प्रवास शेवटी विजय ...! म्हणजेच आजच्या पवित्र अशा विजया एकादशीचा योग होय. सेवानिवृत्तीनंतर अनेक जण अनेक प्रकारचे संकल्प करतात, परंतु नावातच श्याम असलेल्या श्यामरावात सर्व काही सामावलेले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, मुलगी ,तीन बहिणी ,व नातू असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी सात वाजता धाराशिव येथील कपिलधार स्मशानभूमीत होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाकडून समजले. त्यांना सकल संत सेवा समितीच्या सर्व सेवाधारी कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या संकल्पनेतील 20 मार्च रोजी होणारी कथा त्यांच्या स्मरणार्थ असेल.
