धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकांमध्ये महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही स्तरांवर सर्वाधिक जागा जिंकून भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष ठरला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने ही निवडणूक लढवली. या नेतृत्वाखाली केलेल्या नियोजनबद्ध प्रचाराचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा निकालात स्पष्टपणे प्रत्यय आला आहे. मतदारांनी भाजप व महायुतीवर दाखवलेला विश्वास हा विकासकामांना मिळालेला कौल आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शेतकरी, महिला, युवक व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता अधिक वाढली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध राहील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेला हा विजय नेतृत्व, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे फलित असून, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले आहे.
