धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर सांजा, आंबेजवळगे, कसबे तडवळे व येडशी (ता. धाराशिव) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न झाल्या. या सभांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना खासदार निंबाळकर यांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांसह शेतकरी हित, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबविल्याचा ठोस लेखाजोखा मांडला. “आम्ही केवळ आश्वासनांचे राजकारण करत नाही, तर प्रत्यक्ष केलेल्या कामांच्या जोरावरच जनतेसमोर जात आहोत. विकास आणि जनतेच्या विश्वासावरच ही निवडणूक लढवणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. या सभांमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारांनीही पारदर्शक कारभार, प्रामाणिक सेवा आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. ग्रामीण विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण आणि युवकांचे उज्ज्वल भवितव्य हेच आघाडीचे मुख्य ध्येय असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या जाहीर सभांना शिवसैनिक, काँग्रेसचे पदाधिकारी, महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार सभांमुळे धाराशिव तालुक्यात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले असून महाविकास आघाडीला मोठा जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 
Top