भूम (प्रतिनिधी)- दुचाकी वरून प्रवास करत असलेल्या दांपत्याच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा पती गंभीर जखमी झाला असल्याची घटना दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पारडी फाट्याजवळ घडली असून अपघातग्रस्त अज्ञात वाहन फरार झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मळेगाव ता. बार्शी जि. सोलापूर येथील दांपत्य मळेगाव येथून त्यांची दुचाकी क्रमांक एम. एच. 13 ई झेड 3836 वरून मळेगाव येथून वाशी तालुक्यातील दहिफळ येथे नातेवाईकांकडे जात असताना सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पार्टी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील भारती तुकाराम गुगळे वय 38 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. तर तुकाराम गुगळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोहेका बाळासाहेब औताडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
