छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या इतिहासात एक अद्वितीय, लोकोत्तर व्यक्तिमत्त्व म्हणून उभे राहतात. त्यांच्या आधी होऊन गेलेले, त्यांच्या समकालीन तसेच त्यांच्या नंतरच्या असंख्य राज्यकर्त्यांच्या तुलनेत ते सर्वार्थाने सर्वश्रेष्ठ ठरतात. कारण त्यांचे शासन केवळ सत्ता, विस्तार किंवा वैभव यांवर आधारलेले नव्हते, तर ते माणूस केंद्रित, मूल्याधिष्ठित आणि न्यायप्रधान होते.

धर्म, जात, पंथ किंवा कुळ यांपलीकडे जाऊन माणसातील गुण, कर्तृत्व आणि प्रामाणिकपणा यांना महत्त्व देणारी राज्यव्यवस्था शिवरायांनी उभी केली. जातीपातीची उतरंड झुगारून देत, सामान्य घरातील माणसालाही त्याच्या गुणवत्तेनुसार जबाबदारी आणि सन्मान मिळू शकतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच स्वराज्यातील अनेक महत्त्वाची पदे ही समाजाच्या तळागाळातील, खेड्या पाड्यातील, वाडीवस्त्यांतील तरुणांच्या खांद्यावर आली.

शिवाजी महाराजांची दूरदृष्टी केवळ भूमीवर मर्यादित नव्हती. समुद्राचे सामर्थ्य त्यांनी ओळखले आणि भारतीय आरमाराची पायाभरणी केली. परकीय सत्तांनी समुद्रावर वर्चस्व गाजवण्याच्या कितीतरी आधी, स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी आरमार आवश्यक आहे, हे जाणून त्याची स्थापना करणारे ते भारतातील पहिले शासक ठरतात.

त्यांचा राज्यकारभार कर गोळा करण्यापुरता कधीच सीमित नव्हता. रयत कर भरण्यास सक्षम झाली पाहिजे, तिच्या हातात उत्पादनाची साधने असली पाहिजेत, ही त्यांची मूलभूत भूमिका होती. भूमिहीनांना शेतीसाठी जमीन देणे, शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देणे, ते कर्ज निव्वळ नफ्यातून हळूहळू फेडून घेणे, दुष्काळासारख्या आपत्तीमध्ये कर्ज आणि शेतसारा माफ करणे, तसेच मशागतीसाठी बैल आणि साधने स्वराज्याकडून कर्जाऊ स्वरूपात देणे, हे सारे निर्णय त्यांच्या शेतकरीहितैषी धोरणाचे जिवंत उदाहरण होते.

शिवकालीन पाणीव्यवस्था आजही अभ्यासाचा विषय ठरते. गडकोटांवरील पाण्याचा काटकसरीने वापर, त्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन यासाठी कठोर नियम होते. वृक्षतोडीविरोधी कायदे करून पर्यावरणाचे भान त्यांनी त्या काळातच राज्यकारभाराचा अविभाज्य भाग बनवले.

स्त्रियांच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी शिवाजी महाराजांनी अत्यंत कठोर कायदे केले आणि ते तितक्याच कठोरतेने अंमलात आणले. स्त्री ही उपभोगाची वस्तू नाही, तर समाजाचा सन्मान आहे, ही भूमिका त्यांच्या प्रत्येक निर्णयातून स्पष्टपणे दिसून येते.

राज्यकारभार लोकांच्या भाषेतच व्हावा, या हेतूने मराठी भाषेतील शब्दकोश तयार करून घेतला गेला. प्रशासन, न्याय आणि व्यवहार स्वभाषेतून चालवण्याचा आग्रह त्यांनी धरला. वेळेचे भान आणि शिस्त याबाबत शिवाजी महाराजांइतका आग्रही शासक मध्ययुगीन इतिहासात क्वचितच सापडतो.

अकल्पित, धाडसी आणि तरीही यशस्वी लष्करी मोहिमा आखणे, भूगोल आणि ऋतुमानाचा अचूक वापर करणे, गरज भासल्यास स्वतः रणांगणावर उतरून नेतृत्व करणे, अशा असामान्य युद्धनीतीमुळे ते एक अद्वितीय रणधुरंधर ठरतात. त्यांची युद्धनीती केवळ तलवारीवर नव्हे, तर बुद्धी, नियोजन आणि माणसांवरील विश्वासावर आधारलेली होती.

सामान्य घरातील पोरांना एकत्र बांधून, त्यांच्या अंगी असलेले गुण हेरून, त्यांना संधी देऊन, पुढे त्यांचे पराक्रमी सरदारांमध्ये रूपांतर करणे, हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनाच शक्य झाले.

अशा असंख्य असामान्य, अद्वितीय गुणांमुळेच साडेआठ जिल्ह्यांपुरते मर्यादित असलेले स्वराज्य उभे करणारे शिवाजी महाराज हे त्यांच्या पेक्षा कितीतरी पटींनी मोठ्या साम्राज्यांचे अधिपती असलेल्या राज्यकर्त्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतात. आणि हे मत केवळ भावनिक अभिमानाचे नसून, जगातील निष्णात इतिहासकारांनी मान्य केलेले ऐतिहासिक सत्य आहे.

अशी अनेक उदाहरणे देता येतील, ज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे लोकोत्तर व्यक्तिमत्त्व, त्यांची महती आणि त्यांचे रयतेशी असलेले नाते स्पष्टपणे दिसून येते.

अशा रयतेच्या राजांना

अशा लोकोत्तर लोकनायकाला

आपल्या शिवबा राजांना

मनोभावे मानाचा मुजरा

दौलत निपाणीकर.

धाराशिव


 
Top