भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील पाच परीक्षा केंद्रांवर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा शांततेत व सुरळीतपणे सुरू झाली आहे. रवींद्र हायस्कूल भूम, गुरुदेव दत्त हायस्कूल भूम, विनायक विद्यालय इट, पाथरूड विद्यालय भूम, अंतरगाव विद्यालय भूम या ठिकाणी या ठिकाणी एसएससी परीक्षा सुरळीत पार पडल्या जात आहेत.  

पहिल्याच दिवशी प्रथम भाषा मराठी विषयाच्या परीक्षेसाठी एकूण 1521 विद्यार्थ्यांपैकी 1483 विद्यार्थी उपस्थित राहिले. तर उर्दू विषयासाठी 49 पैकी 30 विद्यार्थी परीक्षेला हजर होते. तालुक्यात मराठी माध्यमाचे 1521 व उर्दू माध्यमाचे 49 असे एकूण 1570 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 1513 विद्यार्थी उपस्थित राहिले असून एकूण उपस्थितीचे प्रमाण 96.37 टक्के इतके नोंदविण्यात आले आहे. मराठी माध्यमातील 38 व उर्दू माध्यमातील 19 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. विशेष बाब म्हणजे दिव्यांग असलेले सर्व 10 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.

परीक्षा पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी सर्व पाचही केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. विनायक देशमुख विद्यालय, ईट येथील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आल्यानंतर विभागीय परीक्षा मंडळाच्या सूचनेनुसार केंद्र संचालक बदलण्यात आले आहेत. जिल्हा दक्षता समितीच्या आदेशानुसार सर्व पर्यवेक्षकांची नेमणूक त्यांच्या स्वतःच्या शाळेबाहेरील केंद्रांवर करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची कसून तपासणी करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात आहे. कोणतेही साहित्य वर्गात नेण्यास सक्त मनाई असून प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्राच्या आत व बाहेर अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तालुक्यातील पाचही परीक्षा केंद्रांवर राहुल भट्टी हे परीरक्षक म्हणून काम पाहत आहेत. एकूणच, तालुक्यात एसएससी परीक्षेचा पहिला दिवस शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.


 
Top