भुम (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक मदतीतून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत भुम येथे जिल्हास्तरीय खरेदी-विक्री मेळावा (Buyer-Seller Meet) तसेच केळी पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य मेळावा दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता, रामहरी मंगल कार्यालय, भुम येथे पार पडणार आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी, धाराशिव मा. श्री. कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक, स्वयं सहाय्यता गट (SHG), शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), व्यापारी व वितरक यांना थेट बाजारपेठ व व्यापार संधी उपलब्ध होणार आहेत.
PMFME योजना सन 2020-21 पासून कार्यान्वित असून ग्रामीण भागातील बेरोजगार, नवउद्योजक व शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चावर शासनाकडून 35 टक्क्यांपर्यंत अनुदानाची सुविधा उपलब्ध आहे. व्यक्तिगत लाभार्थी, गट लाभार्थी तसेच FPO व भागीदारी संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या मेळाव्यात उत्पादनांची गुणवत्ता, प्रक्रिया पद्धती, पॅकेजिंग, ब्रँडिंग, विपणन संधी तसेच शासनाच्या विविध योजना व कर्ज सुविधांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाणार आहे. उत्पादक व खरेदीदार यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध करून देत व्यापार वृद्धीस चालना देण्याचा उद्देश आहे. कार्यक्रमादरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या केळी पिक परिसंवादात केळी लागवड, व्यवस्थापन, बाजारपेठ व निर्यात याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा परिसंवाद विशेष उपयुक्त ठरणार आहे. PMFME योजनेअंतर्गत भुम तालुक्यात आतापर्यंत अनेक उद्योगांना मंजुरी मिळाली असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व आर्थिक प्रगतीस चालना मिळत आहे.
या जिल्हास्तरीय खरेदी-विक्री मेळावा व परिसंवादात जास्तीत जास्त शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, भुम यांनी केले आहे.