धाराशिव (प्रतिनिधी)- सन 2017 मध्ये लातूर येथे स्थलांतरित करण्यात आलेले धाराशिव पोस्ट मुख्यालय आता पुन्हा एकदा अधिकृतपणे धाराशिवमध्ये परत आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकार आणि टपाल विभागाकडे केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांनी या संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे डाकघर अधीक्षक कार्यालय परत आणावे अथवा नवीन कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे धाराशिव येथे तत्कालीन दुरसंचार मंत्री टी. एस. श्रृंगारे यांच्या काळात डाकघर अधीक्षक कार्यालय धाराशिव मध्ये सुरू झाले होते. परंतु 2017 रोजी ते जागेअभावी ते लातूरला गेले होते.
स्वतंत्र कार्यालय
दि. 31 जानेवारी 2026 पासून लातूर व धाराशिव जिल्ह्यासाठी स्वतंत्र डाकघर अधीक्षक कार्यालय कार्यरत झाले आहेत. स्वतंत्र डाकघर कार्यालय कार्यरत झाल्यामुळे पोस्ट ऑफिस संदर्भातील सर्व सामान्य लोकांचे प्रश्न लवकर सुटण्यास मदत होईल. धाराशिव मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट, बँक आदी विविध विभाग सुरू असून, मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी असते. धाराशिव येथे जागा नाही ही सबब सांगून 2017 ला डाकघर अधिक्षक कार्यालय लातूरला गेले होते.
नवीन इमारतीचे काय झाले
धाराशिव शहरात मुख्य पोस्ट ऑफिसची इमारत शहराच्या मध्यभागी आहे. 20 हजार स्वे. फुट ऐवढी मोठी जागा असताना देखील कमी जागेत मुख्य पोस्ट ऑफिसची इमारत 60 वर्षापूर्वी उभी करण्यात आली आहे. सदर इमारतीमध्ये आजही मुख्य पोस्ट ऑफिस चालू असून, पोस्ट आलेल्या सर्वसामान्य लोकांना कामासाठी थांबने, उभारणे यासाठी पुरेशी जागाही नसते. या संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर खासदारांनी केंद्रात पाठपुरावा केला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2025 ला अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात धाराशिव पोस्ट ऑफिस संदर्भात उल्लेख करण्यात आला होता. परंतु पुढे काय झाले ? यांची अधिक माहिती मिळू शकली नाही.