धाराशिव (प्रतिनिधी)- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोलापूर अंतर्गत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत वरुडा, होटगी, सवतगव्हाण आश्रमशाळेच्या संघाने विविध क्रीडाप्रकारात विजेतेपद व उपविजेतेपद पटकावले. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारातही आश्रमशाळांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या खेळाची चुणूक दाखवत बक्षिसांची लयलूट केली. तर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या संयुक्त संघानेही अनेक क्रीडा प्रकारात बक्षिसे पटकावली.
धाराशिव येथील श्री तुळजाभवानी स्टेडियमवर दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा रविवारी (दि.22) समारोप झाला. या सोहळ्यात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देवून गौरविण्यात आले. बक्षिस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी पारधी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
क्रिकेट स्पर्धेत वरुडा येथील आश्रमशाळेच्या संघाने विजेतेपद तर सवतगव्हाण आश्रमशाळेच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. वरुडा आश्रशाळेच्या संघाचे श्रीराम कोकाटे हे सामनावीर ठरले. तर सवतगव्हाण संघाचे कप्तान सरतापे हे मालिकावीर ठरले. कबड्डी स्पर्धेत होटगी विजेता तर सवतगव्हाण संघ उपविजेता ठरला. होटगी संघाचे कप्तान के.एस. सूर्यवंशी व सवतगव्हाण संघाचे पवार यांनी बक्षिस स्वीकारले. हॅन्डबॉल स्पर्धेत सवतगव्हाण आश्रमशाळेच्या संघाने विजेतेपद तर प्रकल्प कार्यालय सोलापूर संघाने उपविजेतेपद पटकावले. हॉलीबॉल स्पर्धेतही होटगी आश्रमशाळेच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद तर वरुडा आश्रमशाळेच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
भालाफेक स्पर्धेत पुरूष गटात धावारे, वाघमारे, थोरात यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय तर महिला गटात पूनम कांबळे यांनी प्रथम व अर्चना आबटवार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. गोळाफेक स्पर्धेत पुुरुष गटात कदम यांनी प्रथम, महिला गटात अर्चना आबटवार व पूनम कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात टी.एस. सूर्यवंशी, गणेश दळवी, शरद वाघ तर महिला गटात अर्चना आबटवार, सुप्रिया गवळी, शीतल पिंपरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय तर 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात कोठावळे, भांगरे, मोहोळकर यांनी बक्षिसे पटकावली.
बॅडमिंटन स्पर्धेत वैयक्तिक गटात सी.एम. वाघमारे प्रथम, डी.पी. सूर्यवंशी द्वितीय तर महिला गटात तेजस्विनी माने, सुप्रिया गवळी यांनी शानदार खेळा प्रदर्शन करीत बक्षिसे पटकावली. कॅरम स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरुडा संघाने प्रथम तर होटगी संघाने द्वितीय बक्षिस पटकावले. तर महिला गटात तेजस्विनी माने व अर्चना आबटवार प्रथम, ऐश्वर्या देशमुख व सुप्रिया गवळी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष गटात श्री.थोरात, किसन सूर्यवंशी तर महिला गटात पूजा गाढवे व पूनम कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय बक्षिस पटकावले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी अध्यक्षीय समारोप केला. क्रीडा ध्वज उतरवून वंदे मातरम गीताने क्रीडा स्पर्धेची सांगता करण्यात आली. यावेळी खेळाडू अधिकारी-कर्मचारी, क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
