धाराशिव (प्रतिनिधी)-  जगभरात साजरा होणाऱ्या सुरक्षित इंटरनेट दिन 2026 निमित्त धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले.या कार्यक्रमात जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अंकित सिंह यांनी इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदार वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना सिंह यांनी इंटरनेट म्हणजे काय,त्याचा उपयोग कोणकोणत्या बाबींमध्ये केला जातो,डिजिटल पेमेंटसाठी इंटरनेटचा वापर कसा होतो याची माहिती दिली.तसेच इंटरनेटचा अतिवापर केल्यास होणारे दुष्परिणाम व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबतही त्यांनी उपस्थितांना जागरूक केले.

सायबर गुन्हेगारी,सायबर फसवणूक कशी घडते,अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने होणारे धोके,मजबूत पासवर्ड कसा तयार करावा व तो सुरक्षित कसा ठेवावा,यासह कृत्रिम बुद्धिमत्ता चा जबाबदारीने वापर कसा करावा, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखेचे अधिकारी, कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात,जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हे जिल्हा परिषद सभागृहातून तर विविध विभागाचे अधिकारी -कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

 
Top