धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये धाराशिव जिल्ह्यात निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून भाजप धार्जीण उमेदवार प्रभारी जिल्हा प्रमुख अजित पिंगळे यांनी दिले आहेत. त्यामुळे आज दोन शिवसेना जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेच्या चिश्नहावर निवडून येवून भाजपच्या दारात जावून बसले आहेत. याबाबत आपण लवकरच आमचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेट घेवून वस्तुस्थिती मांडणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार सावंत गटाचे नेते ॲड. अजित खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शनिवार दि. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये ॲड. खोत यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक, संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यावर पण गंभीर आरोप केले. निष्ठावंत शिवसैनिकांना उमेदवारी नाकारल्यामुळे मोहा जिल्हा परिषद गट व शिराढोण जिल्हा परिषद गटात अपक्ष म्हणून निवडणूक लढावावी लागली. तर दुसरीकडे अजित पिंगळे यांनी शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप नेत्यांच्या हातात देवून तुळजापूर तालुक्यातील शहापूर व कळंब तालुक्यातील डिकसळ येथे भाजप कार्यकर्ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढले. निवडून आलेले आज हे दोन्ही जि. प. सदस्य भाजपच्या दारात जावून बसले आहेत. त्यांच्या बॅनरवर शिवसेना नेत्यांच्या ऐवजी भाजप नेत्यांचे फोटो आहेत. या सर्व प्रकाराला पालकमंत्री व जिल्हा संपर्क प्रमुख जबाबदार आहेत. धाराशिव हे शिवसेनेच्या बालेकिल्ला आहे. असे असताना पण नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती असताना भाजपने शिवसेनेचे खच्चीकरण करत शिवसेना उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारी भाजपने परत न घेता निवडणूक लढविली गेली. त्यामुळे शिवसेना उमेदवारांचा मोठ्या प्रमाणात पराभव झाला. 

जिल्ह्यातील शिवसेना संपविण्याचे षडयंत्र भाजप नेते करत असून, याची जाण पालकमंत्री व संपर्क प्रमुख यांना का होत नाही ?  ॲड. खोत यांनी उपस्थितीत केला. आपण लवकरच पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेट घेवून जिल्ह्यातील वस्तुस्थिती सांगणार  आल्याचे सांगितले. 

 
Top