धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या रेखा महावीर बनसोडे यांच्या घरामध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील वीजवाहिनीत बिघाड झाल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत फर्निचर, कपडे, धान्यसाठा शालेय साहित्य तसेच इतर आवश्यक साहित्य जळून नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक व परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यास मदत केली. स्थानिक प्रशासनालाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाने पंचनामा करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. आपत्तीग्रस्त कुटुंबाला त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.