धाराशिव (प्रतिनिधी)- मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव महोत्सव समितीच्या वतीने दि. 18 फेब्रुवारी रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ढोल-ताशांच्या निनादात, शिवभक्तांच्या जयघोषात आणि पारंपरिक सजावटीने नटलेल्या चौकात शिवजन्मोत्सवाचा सोहळा भक्तिमस वातावरणात साजरा करण्यात आला. मध्यरात्री फटाक्याची जोरदार आतषबाजी करून जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध दूरचित्रवाणी मालिका ’जय मल्हार’ फेम अभिनेत्री ईशा केसकर यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या आगमनाने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात जल्लोषपूर्ण सहभाग नोंदविला. त्याचबरोबर संगीत खुर्ची, बकेट-चेंडू, फुग्यांचा खेळ, उखाणे स्पर्धा आदी विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला रंगत आणली. महिलांनी व तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदोत्सवात सहभाग घेतला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संयोजक तथा यशदा परिवाराचे सर्वेसर्वा सुधीर सस्ते आणि मराठा परिवाराच्या व्यवस्थापक दीपांजली माने यांनी कुशलतेने केले. त्यांच्या परिश्रमांमुळे कार्यक्रमाची मांडणी, शिस्तबद्धता आणि सांस्कृतिक सादरीकरण विशेष उठून दिसले. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा भव्यदिव्य स्वरूपात पार पडला. शिवचरित्राचा गौरव आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास समितीचे पदाधिकारी शिवप्रेमी आणि महिला व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

