तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या काक्रंबा (सिंदफळ) गट-गणामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले असून भाजपने या मतदारसंघात ऐतिहासिक आणि निर्णायक विजय मिळवला आहे. 

जिल्हा परिषद गटात भाजपचे दयानंद शिंदे यांनी तब्बल 2684 मतांनी दणदणीत विजय मिळवून काँग्रेसचा गड सर केला. तर पंचायत समिती गणात भाजपचे किसन देडे यांनी 2942 मतांनी मोठा विजय संपादन केला. याशिवाय सलगरा दिवटी गणात भाजपचे वैभव मर्डे यांनी 703 मतांनी विजय मिळवत भाजपची ताकद अधोरेखित केली. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

काक्रंबा गट-गण हा काँग्रेसचा मजबूत किल्ला मानला जात होता. मात्र यंदा भाजपने प्रथमच येथे यश मिळवून इतिहास घडवला आहे. विशेष बाब म्हणजे भाजपचा उमेदवार बाहेरील असतानाही काँग्रेसचा उमेदवार स्थानिक होता, तरीही काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर घसरल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उमेदवारीबाबत शेवटच्या क्षणी बदल होणार असल्याची चर्चा होती. काही ठिकाणी अदला बदलपर्यंत चर्चा पोहोचल्याचे बोलले जात होते. मात्र अखेर दयानंद शिंदे यांची उमेदवारी कायम राहिली. दयानंद शिंदे हे संघ परिवाराशी संबंधित असून त्यांच्या उमेदवारीला अखेरच्या टप्प्यात निश्चिती मिळाल्याचे सांगितले जात आहे.

या गटात भाजपचे दुसरे इच्छुक उमेदवार दत्ता मस्के यांनी मोठी राजकीय “फिल्डींग ” लावल्याचे बोलले जात असून त्याचा थेट फायदा भाजपचे विजयी उमेदवार दयानंद शिंदे यांना झाल्याची चर्चा आहे. तसेच दयानंद शिंदे यांना विजयी करण्यासाठी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे.


काक्रंबा गावात मतांची विभागणी; भाजपला मोठा लाभ

काक्रंबा गट हा तुळजापूरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असून या गटातील सर्वाधिक मतदार काक्रंबा गावातच आहेत. मात्र याच काक्रंबा गावात काँग्रेस, भाजप आणि शिवसेना गटात मतांची विभागणी झाल्याने भाजपला त्याचा मोठा फायदा मिळाला आणि भाजपने मताधिक्य मिळवत गटावर कब्जा केला. या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण विजयी झाले होते. त्यामुळे हा गट काँग्रेसचा सुरक्षित बालेकिल्ला मानला जात होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असता तर भाजपला विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला असता, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांत सुरू आहे. मात्र महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद आणि उमेदवारीतील बेबनावाचा फटका थेट आघाडीलाच बसला आणि त्याचा फायदा भाजपने उचलला.


सलगरा दिवटी गणात भाजपचे काम निर्णायक ठरले.

या मतदारसंघात गट-गणात काँग्रेसचे वर्चस्व मानले जात असले तरी सलगरा दिवटी गणात भाजपचे संघटनात्मक काम मजबूत असल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जात होते. त्याचाच प्रत्यय निकालातून आला. सदर जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असतानाही निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली होती.


भाजपकडे उमेदवारीची मागणीही झाली होती

शहापूर गटातील शिवसेना शिंदे गटाचे विजयी उमेदवार सुनील बनसोडे यांनी काक्रंबा गटातून भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती, अशी माहितीही समोर आली आहे.


राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पहिल्यांदाच झालेला विजय हा केवळ निवडणूक निकाल नसून, तुळजापूर तालुक्यातील आगामी राजकारणाचा नवा अध्याय ठरणार असल्याचे चित्र आहे. सिंदफळ-काक्रंबा गटात भाजपने मिळवलेले यश हे काँग्रेससाठी मोठा धक्का असून भाजपसाठी मोठा आत्मविश्वास वाढवणारे ठरले आहे. काक्रंबा गटातील हा विजय भाजपसाठी “गेम चेंजर” ठरण्याची शक्यता असून पुढील निवडणुकांमध्ये याचा परिणाम तालुकाभर दिसून येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


 
Top