धाराशिव (प्रतिनिधी)- ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाशी संबंधित वाहनांना येडशी टोल नाक्यावर टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी धाराशिव नगर परिषदेचे एआयएमआयएमचे नगरसेवक अजहर मुजावर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात टोल व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी हैदराबाद येथे पक्षाच्या मुख्यालयात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगरपरिषद, महानगरपालिका व पंचायत समिती स्तरावर विजयी तसेच निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून एआयएमआयएम पक्षाशी संबंधित मोठ्या संख्येने चारचाकी वाहने हैदराबादकडे रवाना होणार असून त्यांचा प्रवास मार्ग धाराशिव जिल्ह्यातील येडशी टोल नाक्यावरून जातो. त्यामुळे 14 फेब्रुवारी रोजी संबंधित सर्व वाहनांना टोल शुल्कातून सवलत अथवा पूर्ण माफी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण न येता वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचता यावे, यासाठी ही मागणी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच टोल प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.