कळंब (प्रतिनिधी)- शहरात मोठ्या गाजावाजात आयोजित करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण लोककला महोत्सवावर ढिसाळ नियोजनाचे सावट दिसून आले. गुरुवारी सुरू झालेल्या या महोत्सवाची शुक्रवारी दुपारी घाईघाईत सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या नियोजनातील विस्कळीतपणामुळे कलाकारांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

माहितीनुसार, पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत उपकेंद्र धाराशिव येथील विद्यार्थ्यांनाच कला सादर करण्याची संधी देण्यात आली. दुसऱ्या दिवशी मात्र कळंब तालुक्यातील एकाच कलाकाराला तब्बल तीन प्रकारांत सादरीकरणाची संधी देण्यात आली. तर दुसऱ्या कलाकाराला दोनदा व्यासपीठ मिळाले. इतर अनेक स्थानिक कलाकारांना मात्र संधीच नाकारण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. दोन दिवस कसाबसा ताळमेळ घालत महोत्सव उरकण्यात आल्याची टीका होत असून आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकल्याचे चित्र होते.


“स्थानिकांना डावलून महोत्सवाचा काय उपयोग?”

शहरात एवढ्या मोठ्या महोत्सवाचे आयोजन करताना प्रशासनाने या क्षेत्रात काम करणाऱ्या स्थानिक कलाकारांना अवगत करून सहभागी करणे अपेक्षित होते. मात्र नियोजन करणारे कोण आणि कलाकारांची निवड कशी झाली, याची माहिती कुणालाही देण्यात आली नाही. किमान येथून पुढे तरी पारदर्शकता आणि योग्य नियोजन व्हावे, अशी अपेक्षा आहे.

 हभप. महादेव महाराज आडसुळ, जिल्हाध्यक्ष, जेष्ठ नागरिक संघ, धाराशिव.

          

गाजावाजा नाही, रसिकांपर्यंत माहितीच नाही

तालुक्यात लोककलेचे असंख्य रसिक असताना कोणतीही ठोस प्रसिद्धी न करता कार्यक्रम उरकण्यात आल्याची खंत व्यक्त होत आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना पाचारण करून रिकाम्या खुर्च्या भरल्या गेल्या. विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचा आनंद मिळाला खरा; मात्र रसिकांना संधी न दिल्याने आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ना प्रमाणपत्र, ना सन्मानचिन्ह; कलाकारांचा संताप

लोककला जिवंत राहाव्यात आणि पुढील पिढीला त्यांची ओळख व्हावी या उद्देशाने जिल्हास्तरीय महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कलाकारांना मानधन दिले जाईल, असे सांगण्यात आले; मात्र प्रमाणपत्र “नंतर देऊ” असे सांगितले गेले, तर सन्मानचिन्हाबाबत कोणतेही नियोजन नसल्याचे समोर आले. “अशा विस्कळीत कार्यक्रमांपेक्षा न केलेलेच बरे,” अशी तीव्र प्रतिक्रिया अनेक कलाकारांनी व्यक्त केली.

एकूणच, लोककलेच्या संवर्धनाच्या नावाखाली झालेल्या या महोत्सवाने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भविष्यात तरी स्थानिक कलाकारांना न्याय देत सुयोग्य नियोजन केले जाईल का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 
Top