धाराशिव (प्रतिनिधी)-   युनानी औषधपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करत, युनानी वैद्यक ही ग्रीक, अरबी आणि भारतीय संस्कृतींच्या संगमातून विकसित झालेली पारंपरिक आणि प्राचीन उपचारपद्धती आहे. शरीरातील रक्त, कफ, पित्त आणि काळे पित्त या चार द्रव्यांच्या संतुलनावर आरोग्य अवलंबून असते, असा युनानी तत्त्वज्ञानाचा मूलभूत सिद्धांत आहे. या द्रव्यांमध्ये असमतोल निर्माण झाल्यास रोग उद्भवतात, त्यामुळे नैसर्गिक औषधे, वनस्पती, योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली यांना युनानी उपचारपद्धतीत विशेष महत्त्व दिले जाते, असे डॉ.शिवाजी फुलारी यांनी जागतिक युनानी दिवस यानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात सांगितले.

जिल्हा रुग्णालय,धाराशिव येथे जागतिक युनानी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आयुष विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आयुष विभागातील युनानी तज्ज्ञ डॉ.अबरार अहेमद देशमुख यांनी प्रास्ताविकात हकीम अजमल खान यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.हकीम अजमल खान हे स्वातंत्र्यसैनिक,प्रख्यात युनानी चिकित्सक,शिक्षक आणि समाजसुधारक होते.त्यांनी युनानी चिकित्सा प्रणालीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकसित करून तिचे महत्त्व देश-विदेशात पोहोचविले, असे त्यांनी सांगितले.

डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा शल्यचिकित्सक,धाराशिव व डॉ. सतीश हरिदास,जिल्हा आरोग्य अधिकारी,धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. 

कार्यक्रमास डॉ.नितीन भोसले, डॉ.अंजली पवार, डॉ.अबरार अहेमद देशमुख, डॉ.महेवीश शेख, डॉ.पल्लवी कोथळकर, डॉ. उजमा सय्यद,डॉ.सिमा पवार, किरण बारकुल, भारत हिंगमिरे, मनोज पतंगे (योग तज्ज्ञ), मनीषा अंगरखे, फारुख काजी, सरवदे तसेच रुग्ण,नातेवाईक आणि अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top