कळंब (प्रतिनिधी)-  महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उतेश्वर प्रिंप्री (ता. केज) येथील प्रसिद्ध यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कळंब आगाराने विशेष नियोजन केले असून 15 ते 18 फेब्रुवारीदरम्यान चार दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी तब्बल 25 जादा बसगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख विनोद अलकुंटे यांनी दिली.

मागील 2024-25 वर्षी कळंब व परंडा आगारांनी मिळून 11 जादा बसगाड्या चालवल्या होत्या. त्यातून सुमारे 1 लाख 42 हजार 140 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा वाढती भाविकांची संख्या लक्षात घेऊन कळंब आगाराकडून 15, परंडा 5 आणि भूम आगाराकडून 5 अशा एकूण 25 बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून जवळपास 2 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यात्रेच्या कालावधीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 22 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एस.टी. हुबे, प्रशांत नानजकर आणि जी. एस. जाधवर यांच्याकडे वाहतूक नियंत्रक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच स्थानक प्रमुख निलेश जाधव, श्री. पायाळ, विलास जाधव, नामदेव जागताप, महेश थोरबोले, प्रभाकर झांबरे यांच्यासह इतर कर्मचारीही नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. भाविकांनी अवैध वाहनांचा वापर टाळून सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी एसटी बसनेच यात्रेला जावे, असे आवाहन कळंब आगार प्रशासनाने केले आहे. यात्रेच्या निमित्ताने आगार सज्ज झाले असून भाविकांच्या सेवेसाठी एसटी प्रशासन तत्पर असल्याचे चित्र आहे.

 
Top