धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव व जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 मार्च 2026 रोजी लेडीज क्लब,धाराशिव येथे सकाळी 10 वाजता भव्य विधी सेवा शिबिर व विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे,उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती धाराशिव यांच्या हस्ते, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महामेळावा होणार आहे.
विविध स्टॉल्सच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती वंचित, दुर्बल व गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे व त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.मेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद अंतर्गत विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय,पशुसंवर्धन कार्यालय, आरोग्य विभाग,शिक्षण विभाग, कृषी विभाग,समाजकल्याण विभाग,महिला व बालविकास विभाग,मत्स्यव्यवसाय विभाग, आदिवासी विकास विभाग,प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) तसेच इतर संबंधित विभागांमार्फत विविध योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.या महामेळाव्यात विविध कायदेविषयक अधिकार व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वितरणही करण्यात येणार आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती.अभिश्री देव व सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भाग्यश्री पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू व्यक्तींनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा तसेच मोफत विधीसेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे.