भुम (प्रतिनिधी)- वाशी पोलिसांनी एका धाडसी कारवाईत पवनचक्कीच्या यंत्रसामुग्रीतील कॉपर केबल चोरणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 17 लाख 10 हजार किंमतीच्या केबलसह एकूण 43 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून 6 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.12 फेब्रुवारी रोजी वाशी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सिरेटीका कंपनीच्या पवनचक्क्यांमधून मोठ्या प्रमाणात चोरलेला कॉपर केबलचा साठा आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने मौजे वाशी शिवारातील शेत गट नं. 279 ब येथे लपवून ठेवलेली आहेत. या माहितीच्या आधारे पोहेका कपिल बोरकर व पोलीस अंमलदार शेळके यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली. माहिती सत्य असल्याचे समजताच पोलीस पथकाने तातडीने छापा टाकला.

यामध्ये 53 बंडल कॉपर केबल अंदाजे वजन 1,500 किलो किंमत 17 लाख 10 हजार रुपये, ट्रक क्र. एम. एच. 12 सी एच. 5290 अंदाजे किंमत 25 लाख रुपये, दुचाकी क्र. एम. एच. 25 बी. डी. 5538 अंदाजे किंमत 1 लाख 25 हजार रुपये असा एकूण 43 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ही टोळी गेल्या दोन वर्षांपासून वाशी आणि धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागांत सक्रिय आहे. त्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या केबलची चोरी केल्याचा संशय आहे. या गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र गुलाब काळे, माणिक गुलाब काळे, दया माणिक काळे सर्व रा. कासारखानी, पारधी पिढी, वाशी, रामा उर्फ शेंडी सुबराव काळे, बबलू मधुकर शिंदे दोघे रा. तेरखेडा, सचिन बापू शिंदे रा. इटकूर, ता. कळंब यांचा समावेश आहे.

सदर कारवाईचा पंचनामा करून सिरेटीका कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून मालाची खातरजमा करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, वाशीचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका कपिल बोरकर, राम शेळके, विठ्ठल मलंगनेर, गोपीनाथ पवार, नसीर सय्यद यांचे पथकाने केली. दि. 11 फेब्रुवारी रोजी पाऊण कोटीची आफूची लागवड व दि. 12 फेब्रुवारी रोजी 43 लाख 35 हजाराची कॉपर केबलच्या चोरीचा तपास लावून सलग दोन दिवसात धडाकेबाज कारवाई केल्यामुळे वाशी पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.

 
Top