धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक च्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,या दृष्टीने जिल्ह्यात मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार जिल्ह्यात दि.7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान व दि.9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता,2023 चे कलम 163 अन्वये आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 100 मीटर व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात सर्व राजकीय पक्षांची कार्यालये, उमेदवारांचे मंडप,सर्व दुकाने,मोबाईल, कॉर्डलेस फोन,पेजर,वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके,सर्व प्रकारचे फेरीवाले तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर खाजगी वाहनांना मतदान व मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 100 मीटर व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात नियुक्त अधिकारी व कर्मचारी वगळता पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध राहील. मात्र,मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार या आदेशातून वगळण्यात आले आहेत.

तसेच मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत व मतमोजणी केंद्राच्या 200 मीटरच्या आत संबंधित पक्षाच्या उमेदवारांचे निवडणूक चिन्हांचे प्रदर्शन करण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी/ कर्मचारी तसेच मतदानासाठी आलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणालाही वैध ओळखपत्राशिवाय प्रवेश करता येणार नाही. हा आदेश निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाहीत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने हे आदेश 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी व 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणीच्या दिवशी सकाळी 6 वाजेपासून मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमलात राहणार आहेत.

 
Top