धाराशिव (प्रतिनिधी)- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (टप्पा 2) अंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प,मुंबई स्तरावरून दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रकल्पाच्या टप्पा 2 अंतर्गत वैयक्तिक व सामुदायिक लाभाचे विविध घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.वैयक्तिक लाभामध्ये वृक्ष लागवड,बांबू लागवड,फळबाग लागवड,ठिबक सिंचन संच,तुषार सिंचन,शेततळे,शेततळे अस्तरीकरण,शेडनेटगृह व हरितगृहामधील लागवड साहित्य, गांडूळ खत व पुनर्भरण,पाईप व पंप संच (अनुसूचित जाती व जमातीतील लाभार्थ्यांसाठी), बीजोत्पादन,रेशीम उद्योग,गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, शेळीपालन तसेच भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्ता व घटस्फोटीत महिलांसाठी विशेष लाभांचा समावेश आहे.

सामुदायिक लाभांतर्गत एफपीओ, एफपीसी व एफएसजी यांच्यासाठी 60 टक्के अनुदानावर गोडाऊन उभारणीची सुविधा देण्यात येणार आहे.तसेच उमेद,महिला व आर्थिक विकास महामंडळ पुरस्कृत महिला बचत गट व गावसंघ तसेच एमएसआरएलएम यांच्यासाठी 60 टक्के अनुदानावर औजारे बँक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वेबिनारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती व ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे.

 
Top