कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहर सध्या व्यसनांच्या विळख्यात अडकत चालले असून, विशेषतः 12 ते 30 वयोगटातील तरुण पिढी सुलोचन ओढण्याच्या आहारी गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. चौकाचौकांत, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम व्यसन सुरू असताना कळंब पोलीस प्रशासनाचे संशयास्पद दुर्लक्ष नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे.
व्यसनाच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरात हाणामाऱ्या, वादविवाद, दहशतीचे प्रकार आणि किरकोळ गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे शांत शहराची ओळख पुसली जात असून, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी करूनही पोलीस यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. जर वेळीच ठोस कारवाई झाली नाही, तर ही व्यसनाची लाट तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करेल, असा गंभीर इशारा जाणकार व्यक्त करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून शहरात विशेष मोहीम राबवावी, व्यसन विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि तरुण पिढीला या दलदलीतून बाहेर काढावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.