कळंब (प्रतिनिधी)-  कळंब पोलीस ठाण्याची परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर बनली असून कायद्याचे रक्षकच मनुष्यबळाअभावी असहाय्य झाल्याचे वास्तव समोर आले आहे. कळंब शहर व तालुक्याच्या सुरक्षेसाठी 07 अधिकारी व 89 कर्मचारी असे एकूण 96 पदे मंजूर असताना प्रत्यक्षात फक्त 05 अधिकारी व 51 कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच थेट 40 पेक्षा अधिक पदे रिक्त असून ही परिस्थिती नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत आहे.

पोलीस निरीक्षक 1, सहाय्यक पोलीस निरीक्षक 3 असे वरिष्ठ अधिकारी तैनात असले तरी उपनिरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षकांच्या पदे कमी आहेत. मंजूर 03 पैकी फक्त 02 पोलीस उपनिरीक्षक, तर 08 पैकी केवळ 02 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हजर आहेत. हवालदार, नाईक व अंमलदारांची संख्याही निम्म्यावर आली असून, एकाच कर्मचाऱ्यावर दोन-दोन, तीन-तीन जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत.

वाढती लोकसंख्या, वाहतूक, गुन्हेगारी लक्षात घेता कळंब सारख्या तालुक्याला पुरेसे पोलीस न देणे म्हणजे जाणीवपूर्वक धोका पत्करणे असल्याची भावना व्यक्त होत आहे. जर लवकरात लवकर रिक्त पदांची भरती व तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही, तर कायद्याची अंमलबजावणी ढासळण्याची पूर्ण शक्यता असून याची जबाबदारी कोण घेणार? असा थेट सवाल प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.


असे आहे संख्याबळ

कळंबच्या पोलीस ठाण्याला मंजुर संख्याबळ 1 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक, 8 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 20 पोलीस हवालदार, 15 पोलीस नाईक , 46 पोलीस अंमलदार एकुण 7 अधिकारी व 89 कर्मचारी मंजूर आहेत. त्या पैकी सध्या हजर 1 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 पोलीस उपनिरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 9 पोलीस हवालदार, 7 पोलीस नाईक, 33 पोलीस अंमलदार एकुण 5 अधिकारी व 51 पोलीस कर्मचारी आहेत. त्यात कोणी सुट्टीवर तर कोण रजेवर आहेत. त्यामुळे तपासात व सुरक्षेवर परिणाम होत आहे.

 
Top