कळंब (प्रतिनिधी)- देशसेवेतील प्रदीर्घ व गौरवशाली कार्याचा सन्मान करणारा “सेवापूर्ती गुणगौरव सोहळा” कळंब तालुक्यात सोमवारी, दि. 12 जानेवारी रोजी अत्यंत भावनिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. भारतीय थलसेनेतील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडिअर (निवृत्त) सुमंत दशरथ (मराठा लाईट इन्फंट्री) व लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) भिमराव शिवाजी पवार (आर्मी एज्युकेशन कोअर) यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

हा सोहळा कळंब माजीसैनिक, वीरमाता, वीरपत्नी, एनसीसी ग्रुप व माजीसैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तालुक्यातील शेकडो माजी सैनिक गणवेषात उपस्थित राहिल्याने सभागृहात सैनिकी शिस्त, अभिमान व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, तहसीलदार हेमंत ढोकळे, गटविकास अधिकारी सोपान अकोले तसेच जिल्हा सैनिक कार्यालय, धाराशिवचे जी.ए. कुलकर्णी यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी आपल्या भाषणात, “सैनिक म्हणजे शिस्त, अनुशासन, प्रामाणिकपणा, त्याग आणि बलिदान यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. माजीसैनिकांच्या सन्मानासाठी प्रशासन नेहमीच कटिबद्ध आहे,” असे स्पष्ट केले. तहसीलदार हेमंत ढोकळे यांनी माजीसैनिकांच्या प्रश्नांवर तत्परतेने न्याय देण्याची ग्वाही देत अमर जवान स्मारकासाठी आवश्यक असलेली जागा चर्चेतून मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले. सैनिकांचा सन्मान राखून सेवा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. गटविकास अधिकारी सोपान अकोले यांनी देशभक्तीपर गीत सादर करून सभागृहात ऊर्जा व उत्साह निर्माण केला.

सत्कारमूर्ती ब्रिगेडिअर (निवृत्त) सुमंत दशरथ यांनी आपल्या मनोगतात, “माझ्या यशाचे श्रेय आई-वडील आणि माझ्या ज्युनियर सहकाऱ्यांना जाते. अधिकारी म्हणून काम करताना माझा ज्युनियर सुखी असेल, तरच मी सुखी असतो, या तत्वावर मी कार्य केले,” असे सांगितले. अमर जवान स्मारक पुढील पिढीसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) भिमराव पवार यांनी सामान्य सैनिकापासून अधिकारी पदापर्यंतचा आपला प्रवास उलगडून दाखवत माजी सैनिकांना शासकीय नोंदी, पेन्शन व विविध प्रक्रियांबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. “भारत माता की जय” च्या घोषात हा गौरवसोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एस. के. पुरी यांनी मानले.

 
Top