कळंब (प्रतिनिधी)- राज्य परिवहन महामंडळाच्या शयनयान व शिवाई या तथाकथित “आधुनिक” बस सेवांमधून दिव्यांग नागरिकांना प्रवास सवलत नाकारणे म्हणजे सामाजिक न्यायाची थेट हत्या आहे. दिव्यांगांना हक्क म्हणून मिळणारी सवलत डावलून शासनाने पुन्हा एकदा दुर्बल घटकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

शासनाच्या घोषणा कागदावर आणि जाहिरातीपुरत्याच मर्यादित राहिल्या असून प्रत्यक्ष प्रवासात मात्र दिव्यांगांना पूर्ण तिकीट भरायला भाग पाडले जात आहे. हा निर्णय म्हणजे दिव्यांगांविरोधातील अमानुष, असंवेदनशील व अन्यायकारक धोरणाचा जिवंत पुरावा आहे. दिव्यांग सवलत ही दया नाही, भीक नाही, तर घटनात्मक अधिकार आहे. तरीही शयनयान व शिवाई बस सेवांना सवलतीतून वगळून शासन जाणीवपूर्वक दिव्यांगांना आर्थिक लुटीला सामोरे जावे लागत आहे. हा अन्याय तात्काळ थांबवला नाही, तर राज्यभर रस्त्यावर उतरून लढा उभारला जाईल, असा इशारा दिव्यांग संघटनांनी दिला आहे.

आता गोड आश्वासनांना वेळ उरलेली नाही. शयनयान व शिवाई बसमधून दिव्यांगांना प्रवास सवलत तात्काळ लागू करा, अन्यथा हा प्रश्न आंदोलन, चक्का जाम आणि कायदेशीर लढ्याच्या मार्गाने अधिक तीव्र केला जाईल, अशी मागणी दिव्यांग संघटनेमार्फत परिवहन महामंडळाकडे करण्यात आलेली आहे.

 
Top