धाराशिव (प्रतिनिधी)- नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी राबविण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) संतोष राऊत तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या लोकशाही दिनात एकूण चार तक्रारी प्राप्त झाल्या.त्यामध्ये उपविभागीय अधिकारी धाराशिव यांच्याकडे दोन,भूमी अभिलेख विभागाकडे एक व उपनिबंधक धाराशिव यांच्याकडे एक तक्रार दाखल करण्यात आली. विशेष बाब म्हणजे यापूर्वी प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा निपटारा प्रशासनाने वेळेत केला आहे. लोकशाही दिन हा नागरिक व प्रशासन यांच्यातील थेट संवादाचा प्रभावी मंच असून सामान्य नागरिकांना आपली समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडण्याची संधी मिळते. यामुळे प्रशासकीय विलंब कमी होतो. पारदर्शकता वाढते आणि नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास दृढ होतो. लोकशाही दिनामुळे न्याय सुलभ, जलद व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो. नागरिकांनी लोकशाही दिनाचा लाभ घेऊन आपल्या समस्या मांडाव्यात व त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
