वाशी (प्रतिनिधी)-  येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर यांच्या नामविस्तार दिनाचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. मिलिंद शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभाग प्रमुख व संयोजक प्रा. डॉ. रवी चव्हाण यांनी केले.

यावेळी बोलताना प्रा. मिलिंद शिंदे यांनी विद्यापीठाच्या नामांतरासाठी सोळा वर्षे चाललेल्या संघर्षाचा इतिहास मांडत या लढ्यात राजा ढाले, रामदास आठवले, अरुण कांबळे, गंगाधर गाडे यांच्यासह गौतम वाघमारे या दलित तरुणांच्या बलिदानाचा उल्लेख केला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक कदम यांनी नामांतराचा लढा हा सामाजिक अस्मितेची लढाई असल्याचे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व सर्वसमावेशक असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवी चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. महादेव उंद्रे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राहुल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. कृष्णा थोरात, स्वप्निल शेळकांदे व नरसिंग ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top