धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेची मोहीम ही लुट नव्हती, तर स्वराज्य उभारणीसाठी आवश्यक असलेली रसद आणि आर्थिक बळ उभे करण्याची ती दूरदृष्टीपूर्ण रणनीती होती. या मोहिमेच्या ऐतिहासिक संदर्भांकडे दुर्लक्ष करून, इतिहासाचा अभ्यास नसलेल्यांकडून महाराजांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा अपप्रचारातून इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न होतोय, याबाबत समाजाने सावध राहावे, असे आवाहन इतिहास अभ्यासक केतन पुरी यांनी केले.
मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित भैरवाचा भंडारा व आग्रा स्वारी या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा प्रणिताताई पंकज पाटील, सचिव डॉ. अस्मिता बुरगुटे यांच्यासह सुरेखा जगदाळे, चंद्रकांत बागल, कल्याण पवार, शरद मुंडे, पत्रकार हुंकार बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
केतन पुरी यांनी आग्रा स्वारीचा प्रसंग उलगडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबासमोर दाखवलेले अद्वितीय बुद्धीचातुर्य, स्वराज्यासाठी जीव धोक्यात घालून केलेला थरारक प्रवास आणि अपमानाला न झुकता दिलेले सडेतोड प्रत्युत्तर यांची प्रभावी मांडणी केली. इतिहासाच्या पानांत दडलेले, क्वचितच चर्चेत येणारे अनेक संदर्भ त्यांनी उलगडले. या कार्यक्रमाला शिवप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली. इतिहासाचा सखोल अभ्यास आणि मांडणीतील वेगळेपणाबद्दल आमदार कैलास पाटील यांनी केतन पुरी यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित बागल यांनी केले. सूत्रसंचलन दौलत निपाणीकर यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ. अस्मिता बुरगुटे यांनी केले.
जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने पुरस्कार वितरण,
दरम्यान, जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राजमाता जिजाऊ पुरस्काराने द्रौपदी नानासाहेब खोत यांचा सन्मान करण्यात आला. कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न पुरस्कार अमरसिंह गोरे, छत्रपती शहाजी राजे क्रीडा भूषण पुरस्कार राम हिरापुरे, तर छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार आत्माराम सोनवणे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाने इतिहास, प्रेरणा आणि सन्मान यांचा संगम घडवत जिजाऊ जन्मोत्सवाची शोभा द्विगुणित केली.
