वाशी (प्रतिनिधी)-  जिल्हा धाराशिव हद्दीत जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, कायदेशीर चौकटीत व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या आदेशानुसार जमावबंदी लागू करण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वाशी यांच्या वतीने हद्दीतील सर्व नागरिक, मतदार व उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक काळात सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर, भडकावू किंवा समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. असे वर्तन आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. सोशल मीडियाच्या वापराबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करताना WhatsApp, Facebook, Instagram, YouTube आदी माध्यमांवर जात, धर्म, पंथ किंवा वर्गद्वेष पसरवणारे संदेश, पोस्ट, व्हिडिओ, रील किंवा स्टेटस टाकण्यास सक्त मनाई असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच मतदानाचे जात-धर्माधारित ध्रुवीकरण करणारी, चुकीची माहिती, अफवा किंवा दिशाभूल करणारी सामग्री प्रसारित केल्यास संबंधितांवर आयटी कायदा व निवडणूक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव असून कोणत्याही प्रकारचा गोंधळ, तणाव किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारी कृती सहन केली जाणार नाही. सर्व नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. उमेदवारांसाठीही स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून परवानगीशिवाय सभा, वाहनफेऱ्या, मोर्चे किंवा ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. तसेच परवानगीशिवाय प्रचार साहित्य लावणे किंवा वाटप केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आचारसंहिता व कायद्याचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, आयटी कायदा व निवडणूक कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन अटक, दंड किंवा तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. अखेर पोलिसांनी जनतेला आवाहन करताना कोणत्याही दबावाला बळी न पडता, जात-धर्माचे राजकारण टाळून विवेकबुद्धीने मतदान करून लोकशाही अधिक बळकट करण्याची नम्र विनंती केली आहे.


 
Top