तुळजापूर (प्रतिनिधी)- समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवणे आणि त्या शिक्षणाला सेवाभावाची जोड देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांनी केले. ‌‘सेवाभावातून शिक्षण‌’ या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते.

 तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे मसला खुर्द येथे सुरू आहे. या शिबिरात आज  सर्व स्वयंसेवकांनी श्रमदान केले श्रमदान करत असताना गावातील मुख्य रस्ता, शोष खड्डे मुख्य रस्ता व प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छता करून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. 

आपल्या मार्गदर्शनात पांढरे यांनी सांगितले की, केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये समाजभान, संवेदनशीलता व सेवावृत्ती निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी स्वयंसेवी संस्था, युवक व विद्यार्थी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करताना त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांची उदाहरणे दिली. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, साक्षरता, आरोग्य जनजागृती अशा क्षेत्रांत सेवाभावातून शिक्षण कसे प्रभावी ठरू शकते, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षणातून मूल्यसंस्कार घडवले गेले तरच जबाबदार नागरिक घडतील, असे सांगून त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना, युवक चळवळी व सामाजिक कार्यात विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. सेवाभावातून मिळणारे शिक्षण हे आयुष्यभर उपयोगी पडते आणि व्यक्तिमत्त्व विकासास हातभार लावते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. उपस्थितांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शनाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.

यावेळी गावातील ग्रामस्थ स्वयंसेवक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गोकुळ बाविस्कर तर आभारप्रदर्शन प्रा कुकडे यांनी केले यावेळी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा गोकुळ बाविस्कर, कार्यक्रमाधिकारी प्रा बैनवाड स्वाती, प्रा.सुदर्शन गुरव, प्रा.बाळासाहेब राऊत, प्रा. सतीश वागतकर तसेच प्रा. क्रांती कदम आणि गावातील ग्रामस्थ महाविद्यालयातील कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top