कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरात महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसह सुरक्षित, सुसंस्कृत आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्या पुढाकारातून नगरपरिषद कार्यालयात एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक संपन्न झाली. शहरातील वाढत्या छेडछाडीच्या घटना, टवाळखोरांचा त्रास, शाळा–महाविद्यालय परिसरातील असुरक्षितता या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत निर्णायक ठरली.
या बैठकीस पोलीस प्रशासन, बस स्थानक प्रतिनिधी, शाळा–महाविद्यालये व कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी, पत्रकार, पालक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान अनेक विद्यार्थिनींनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी, शाळा परिसरात व प्रवासादरम्यान होणाऱ्या छेडछाडीच्या घटना भावनिक शब्दांत मांडल्या. या गंभीर तक्रारींवर उपस्थित यंत्रणांनी गांभीर्याने दखल घेत तात्काळ उपाययोजनांचे निर्णय घेण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मगर व पिंक पथक प्रमुख जाधव मॅडम यांनी प्राप्त तक्रारींची नोंद घेतली असून त्यावर त्वरित अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संशयित टवाळखोरांवर नजर ठेवणे, शाळा व कॉलेज परिसरात पोलीस गस्त वाढवणे, सीसीटीव्ही व पिंक पथकाची सक्रियता वाढवणे यावर भर देण्यात आला.
शहरात गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न, अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देणे, शाळा परिसरात बिनधास्त फिरणारे टवाळखोर यांना चाप बसवण्यासाठी कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांनी “Safe City, Safe Girl” हा विशेष उपक्रम राबविण्याची घोषणा केली.
या उपक्रमाअंतर्गत महिला सुरक्षेसाठी समन्वयित कृती आराखडा, जनजागृती, पालक-शिक्षक सहभाग, तसेच पोलीस व नगरपरिषदेची संयुक्त यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. शहरात सुरू असलेल्या या सकारात्मक बदलांमुळे उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्षांच्या निर्णयाचे स्वागत केले.
या बैठकीस नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती गुर्मे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्यासह नगरसेवक, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
“कळंब शहरातील प्रत्येक मुलगी, महिला आणि विद्यार्थी सुरक्षित असल्याची भावना मनात बाळगेल, हेच माझे ध्येय आहे. छेडछाड, टवाळखोरी आणि असभ्य वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही. ‘Safe City, Safe Girl’ उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस, पालक, शाळा व नगरपरिषद एकत्र येऊन ठोस आणि कडक कारवाई करू. सुरक्षित शहर हे केवळ घोषणा नाही, तर आमची जबाबदारी आहे.”
नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे
