तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील सर्व नाले, गटारी व परिसरात साचलेला कचरा तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था लक्षात घेता, शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी व कचरा संकलन व घंटागाडीची व्यवस्था नियमित करावी, अशी मागणी नगरसेवकांच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
याबाबत तुळजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दि. 1 जानेवारी 2026 रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर शहरातील अनेक ठिकाणी नाले व गटारी तुंबलेले असून, त्यामधून घाणेरडे पाणी वाहत आहे. त्यामुळे डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच शहरातील काही भागांमध्ये गटारींची चेंबर उघडी असल्याने अपघात होण्याची शक्यता असून, त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ न ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय, शहरात सर्वत्र कचरा पसरलेला दिसून येत असून, कचरा कुंड्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे कचरा घंटागाडीची वेळ निश्चित करून ती दररोज सर्व भागांत फिरवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन नगरसेवक अमोल माधवराव कुंतक, अक्षय धनंजय कदम, रणजीत चंद्रकांत इंगळे, आनंद नामासाहेब जगताप व प्रांती गोपाळ लोखंडे यांनी दिले असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
