भूम (प्रतिनिधी)- शहरातील ग्रामीण रुग्णालयात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक सकारात्मक व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. जनशक्ती विकास आघाडीचे 14 नवनियुक्त नगरसेवक, थोड्या मतांनी पराभूत झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सत्वशीला धनाजीराव थोरात, युवा नेते यशवंत राजे थोरात, भाजप तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर यांच्या उपस्थितीत शहरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन रुग्णालय परिसराची साफसफाई केली.

ग्रामीण रुग्णालयाच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून या सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा ठोस संदेश दिला. या अनोख्या उपक्रमाची शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून, लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर आदर्श ठेवला असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. यावेळी बोलताना सत्वशीला धनाजीराव थोरात म्हणाल्या की, “स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि नववर्षात भूम शहरात स्वच्छतेचे काम अविरत सुरू राहावे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली आहे.”

या उपक्रमात नवनियुक्त नगरसेवक रुपेश आप्पा शेंडगे, अनिल दादा शेंडगे, आबासाहेब मस्कर, चंद्रमणी गायकवाड, सुनीता दत्ता काळे, शीतल अमोल गाडे, सुनीता गणेश वीर, लक्ष्मी प्रशांत साठे, चंद्रकला हरीशचंद्र पवार, शमशाद हारुण मुजावर, नुरजहाँ महमंद इसाक माणियार, विठ्ठल अण्णा बागडे, नवनाथ विलास रोकडे, रामराजे बाळासाहेब कुंभार यांच्यासह महिला, शहरातील नागरिक व जनशक्ती विकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमातून नववर्षाची सुरुवात स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीच्या संदेशाने झाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

 
Top