धाराशिव (प्रतिनिधी) - दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटर नॅशनल सेंटर, जनपथ, नवी दिल्ली येथे रूपामाता फाउंडेशन, धाराशिव व श्री गणेश सेवा मंडळ दिल्ली (रजि.), लक्ष्मीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला वंदे मातृशक्ती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वर्गीय हिराबेन यांच्या त्यागामुळे व कष्टामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी घडले आहेत असे सांगितले.
वंदे मातृशक्ती माता पूजन हा मातृभूमीप्रेम, मातृसंस्कार व मातृत्वाच्या गौरवशाली परंपरेचा उत्सव साजरा करणारा एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम ठरला. मातृत्वाच्या तेजस्वी मूल्यांचा गौरव वृद्धिंगत करण्यासाठी देशभरातील महान मातांना एका मंचावर आमंत्रित करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संयोजन रूपामाता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकट विश्वनाथ गुंड व श्री गणेश सेवा मंडळ दिल्ली (रजि.) चे संस्थापक अध्यक्ष महेंद्र लड्डा यांनी केले. या प्रसंगी राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्लीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, खासदार बांसुरी स्वराज, न्या. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती ज्ञानसुधा मिश्रा, अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य लोकेश मुनी, पोलीस कमिशनर अजय चौधरी, कालीपुत्र कालीचरण महाराज, भाजपाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, हभप प्रकाश महाराज बोधले, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, हभप सोपान महाराज सानप शास्त्री, धाराशिव जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, यशस्वी उद्योजक व्ही. पी. पाटील, हभप पांडुरंग लोमटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, व्यंकट मरगणे तसेच रूपामाता परिवाराचे कार्यकारी संचालक अजित गुंड आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी सादर केलेले शिव तांडव व ‘वंदे मातरम’ हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी झालेल्या भजनसंध्येत उपस्थित मान्यवर व रसिकांनी या सादरीकरणाचा भावपूर्ण आनंद घेतला. हभप पुरुषोत्तम पाटील यांनी गायलेल्या आई माझी या कवितेमुळे सभागृहातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रुधारा आल्या. मात्र त्यानंतर झालेल्या हभप विशाल खोले महाराजांच्या पिंगळा या विशेष किर्तन प्रकारामुळे सभागृहात ऊर्जा निर्माण झाली. हभप सोपान सानप शास्त्री महाराजांच्या संबोधनातून ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्राचे दर्शन दिल्लीकरांना झाले. यावेळी डॉ. किरण झरकर लिखित वंदे मातृशक्ती या सांस्कृतिक पुस्तकाचे प्रकाशन सर्व साधुसंतांच्या व मान्यवरांच्या हस्ते झाले.
या वेळी आचार्य लोकेश मुनी यांच्या मातोश्री मैना देवी, माजी जनरल रविंद्र सिंह यांच्या मातोश्री चंद्रावती रुढ, क्रिकेटपटू राजवर्धन सुहास हंगरगेकर यांच्या मातोश्री अनिता हंगरगेकर, कु. कृष्णा बंग यांच्या मातोश्री मीरा कमलकिशोर बंग, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई भुतेकर, हभप सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या मातोश्री प्रयागबाई सानप, तसेच हभप विशाल खोले महाराज यांच्या मातोश्री बेबीआई खोले या सर्वांचा आदर्श माता म्हणून गौरव करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफल, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक रूपामाता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकट विश्वनाथ गुंड पाटील व श्री गणेश सेवा मंडळ दिल्ली (रजि.), लक्ष्मीनगरचे संस्थापक अध्यक्ष महेन्द्र लड्डा यांनी खासदार बांसुरी स्वराज यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर म्हणाल्या की, राजमाता जिजामाता या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु होत्या. देशभरामध्ये अनेक राष्ट्रभक्त व्यक्तिमत्त्वांच्या मातांनीच त्यांना घडवले. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माता हिराबेन यांची पुण्यतिथी आहे. हिराबाचे जीवन अत्यंत सामान्य आणि कष्टप्रद होते. मात्र त्यांनी नरेंद्र मोदी सारख्या अत्यंत कर्तबगार राष्ट्रभक्त जागतिक नेत्याला घडवले. हिराबांच्या असीम त्यागामुळे आणि कठीण परिश्रमामुळे नरेंद्र मोदीजींच्या व्यक्तिमत्त्वाला तेजस्वी आकार मिळाला. हिराबा यांच्या व्यक्तिमत्त्वावर बोलताना त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व हिराबा यांच्या माता पुत्राच्या असीम प्रेमाचे व मायेचे साक्षात रूपच सभागृहात उभे राहिले. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रमाता अहिल्यादेवींचा आवर्जून उल्लेख करत असताना सांगितले की या महान मातेने अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. प्रत्येकाने आपल्या आईवर नितांत प्रेम केले पाहिजे असे प्रतिपादन करत असताना त्यांनी हे सांगितले की पुढच्या वर्षी देशात सगळीकडे हा दिवस वंदे मातृशक्ती माता पूजन दिवस म्हणुन देशभरात झाला पाहिजे.
यावेळी बांसुरी स्वराज यांनी देशभरातील मातांच्या सन्मानार्थ अशा उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. महिलांचे सशक्तीकरण व मातांच्या सन्मानाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले असून, असे कार्यक्रम त्या दृष्टीला प्रत्यक्षात उतरवतात, असे त्यांनी नमूद केले.
महेन्द्र लड्डा यांनी सांगितले की, माता ही संस्कारांची मूळाधार, कुटुंबाचे हृदय व समाजाचा नैतिक केंद्रबिंदू आहे हा संदेश देशभर दृढ करणे हाच या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.
ॲड. व्यंकट गुंड पाटील यांनी स्पष्ट केले की, ‘वंदे मातृशक्ती माता पूजन दिन’ हा केवळ सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रम नसून, भारतीय समाजव्यवस्थेत मातृत्वाचे स्थान, महत्त्व व गौरव यांची पुनर्स्थापना करणारा मूल्यनिष्ठ राष्ट्रीय अभियान आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून दिल्लीत शेकडो लोकांचे आगमन झाले होते. दिल्लीतील अनेक मान्यवर निमंत्रित कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रूपामाता परिवाराच्या वतीने अनेकांना नववर्षी निमित्ताने दिल्ली दर्शन, उज्जैन महाकाल दर्शन, वृंदावन, मथुरा इथे आध्यात्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले. समाजातील अनेक मान्यवरांनी या वंदे मातृशक्ती माता पूजन दिन या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे.
